पॅरिस : भारताचा सर्वाधिक अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णाने सोमवारी निवृत्तीची घोषणा केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत श्रीराम बालाजीच्या साथीने खेळताना बोपण्णाला सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला. यानंतर बोपण्णाने आपण भारतासाठी अखेरचा सामना खेळल्याचे सांगितले.
४४ वर्षीय बोपण्णा यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचा सर्वाधिक अनुभवी क्रीडापटू होता. ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद मिळवणाऱ्या बोपण्णा आणि त्याचा सहकारी बालाजी यांना पहिल्या फेरीत फ्रान्सच्या जोडीने नमवले. रॉजर वॅसेलिन आणि गेल मोनफिल्स या जोडीने बोपण्णा-बालाजी यांना ७-५, ६-२ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. तसेच पुरुष एकेरीत सुमित नागलही रविवारी पराभूत झाला. त्यामुळे टेनिसमधील भारताचे आव्हान संपुष्टात आले. १९९६ पासून भारताला टेनिसमध्ये एकही ऑलिम्पिक पदक जिंकता आलेले नाही.
“भारतीय संघाच्या जर्सीत हा माझा अखेरचा सामना होता. सध्या माझे वय व तंदुरुस्तीचा विचार करता ही माझ्या कारकीर्दीतील अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा आहे, हे आधीच स्पष्ट होते. यापुढे मी फक्त टेनिसचा आनंद लुटणार असून डब्ल्यूटीए स्पर्धांमध्ये खेळत राहणार आहे,” असे बोपण्णा म्हणाला. बोपण्णाने आधीच डेव्हिस चषकातून निवृत्ती जाहीर केली होती. २०१०मध्ये ब्राझीलच्या रिकार्डो मेल्लोविरुद्धची लढत कायम स्मरणात राहील, असेही त्याने सांगितले.