पॅरिस : टेबल टेनिसमध्ये भारताच्या मनिका बत्राने सोमवारी मध्यरात्री ऐतिहासिक कामगिरी नोंदवताना प्रथमच उपउपांत्यपूर्व (राऊंड ऑफ १६) फेरीत मजल मारली. ऑलिम्पिकमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारी ती भारताची पहिलीच टेबल टेनिसपटू ठरली आहे.
महिला एकेरीतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात २९ वर्षीय मनिकाने फ्रान्सच्या प्रिथिका पव्हेडचा ४-० असा धुव्वा उडवला. मनिकाने प्रिथिकावर ११-९, ११-६, ११-९, ११-७ असे वर्चस्व गाजवले. मनिकाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच फेरीत पराभव पत्करला होता. मात्र आता तीन उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. “फ्रान्सच्या खेळाडूला त्याच्याच देशात नमवल्याचा आनंद आहे. तसेच प्रिथिका क्रमवारीतही माझ्यापेक्षा वरच्या स्थानी होती. या विजयामुळे आत्मविश्वास बळावला असून यापुढेही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करेन,” असे मनिका म्हणाली.
महिला एकेरीत भारताची श्रीजा अकुला बुधवारी दुसरी फेरी खेळणार आहे. पुरुष एकेरीत मात्र भारताच्या हरमीत देसाई व अचंता शरथ कमल यांना सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला. आता सांघिक प्रकारात पुरुषांकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे.