नॉर्वे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचा कार्लसनला धक्का; गुकेशचा सलग दुसरा पराभव X
क्रीडा

नॉर्वे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचा कार्लसनला धक्का; गुकेशचा सलग दुसरा पराभव

भारताचा तरुण ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत प्रज्ञानंदने कार्लसनचा पराभव करून पूर्ण तीन गुण मिळवले.

Swapnil S

ओस्लो : भारताचा तरुण ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत प्रज्ञानंदने कार्लसनचा पराभव करून पूर्ण तीन गुण मिळवले.

दुसरीकडे, विद्यमान जागतिक विजेता डी. गुकेश याची सुमार कामगिरी या फेरीतही कायम राहिली असून त्याला पुन्हा एकदा अपयशाला सामोरे जावे लागले. या विजयामुळे प्रज्ञानंद ४.५ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कार्लसन सध्या सहा खेळाडूंच्या या स्पर्धेत अव्वल स्थानावरून घसरून केवळ १.५ गुणांसह सर्वात शेवटी आहे. प्रज्ञानंदने कार्लसनला क्लासिकल प्रकारात पराभूत करण्याची ही दुसरी वेळ आहे.

दुसऱ्या एका सामन्यात अलिरेझा फिरौझा याने डी. गुकेशला आर्मागेडन फेरीत पराभूत करून ७.५ गुणांसह आघाडी मिळवली. फिरौझा हा रोमानियातील एका स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे अत्यंत त्रासात खेळत होता. त्याला व्हीलचेअरवरून स्पर्धास्थळी आणण्यात आले होते. तरीही त्याने उत्कृष्ट खेळ करत विजय मिळवला. या पराभवामुळे गुकेश चौथ्या स्थानावर घसरला आहे.

कार्लसनविरुद्धच्या विजयानंतर प्रज्ञानंद म्हणाला की, “हा सामना मॅग्नसच्या बाजूनेही जाऊ शकला असता, त्यामुळे या विजयाचा अतिशय मोठा आनंद साजरा करण्याची गरज नाही. पहिल्या भागात मी चांगला आणि नियंत्रणात खेळलो याचा आनंद आहे.” दरम्यान, कार्लसनने मान्य केले की त्याने एका चालीसाठी तब्बल २८ मिनिटे विचार केला आणि शेवटी चुकीचा निर्णय घेतला.

महिलांच्या गटात दिव्या देशमुख हिने उत्कृष्ट कामगिरी करत कझाकस्तानच्या बिबिसारा अस्साउबायेव्हाविरुद्ध आर्मागेडन फेरीत तिसरा विजय नोंदवला. दिव्या आता ४.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून अस्साउबायेव्हा ५.५ गुणांसह आघाडीवर आहे.

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग

Bhayandar : सूर्या प्रकल्पाच्या पाइपलाइन टेस्टिंगदरम्यान स्फोट; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

Navi Mumbai : सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच; खारघर, कळंबोली, तळोजात पाणीटंचाईचे संकट

मध्य रेल्वेवर दररोज ११ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवासी