मुंबई : भारताचा माजी फिरकीपटू प्रग्यान ओझाची अखेर सोमवारी राष्ट्रीय पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. पश्चिम विभागातून समितीचे नवे सदस्य म्हणून माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची निवड करण्यात आली आहे.
अजित आगरकर यांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आल्यावर निवड समितीत सर्वाधिक २४ कसोटी सामन्यांचा अनुभव ओझाकडे आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ओझाच्या अध्यक्षतेखालील समितीत पोवार, शिवसुंदर दास, रुद्रप्रताप सिंह, अजय रात्रा यांचा समावेश आहे. पोवारसह वासिम जाफर यांनी देखील पश्चिम विभागातून निवड समिती सदस्यासाठी अर्ज केला होता. मात्र पोवार यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट सल्लागार समितीने केलेल्या शिफारशीनुसार पाेवार यांची निवड करण्यात आली असून, वरिष्ठतेच्या आधारावर अंतरिम प्रमुख ओझा समितीचे अध्यक्षपद भूषवेल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले.
माजी डावखुरा फिरकी गोलंदाज ओझाने आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत २४ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान, ४८ वर्षीय पोवार यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना दोन कसोटी सामने आणि ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी मुंबई, गुजरात आणि भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवले आहे, तसेच ते बेंगळुरूतील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या काळात त्यांनी २०२२ मध्ये आशिया चषक स्पर्धा जिंकून दिली आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवून दिले.
पोवार यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १४८ सामन्यांत ४७० बळी टिपले आहेत. तसेच तळाच्या फलंदाजीत ४,२४५ धावा केल्या असून त्यात सात शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. बेंगळुरू येथील बीसीसीआय मुख्यालयात १५ ऑक्टोबर रोजी नवीन निवड समितीसाठी मुलाखती पार पडल्या. या मुलाखतीसाठी पोवार यांच्यासह माजी क्रिकेटपटू सलिल अंकोला, जाफर, जेकब मार्टिन आणि कॉनर विल्यम्स यांनी सहभाग घेतला होता. अखेर पोवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.