पंजाबचे पुत्तर दिल्ली जिंकणार? अरुण जेटली स्टेडियमवर आज उभय संघांत लढत; अक्षरची दुहेरी कसोटी 
क्रीडा

IPL 2026 : पंजाबचे पुत्तर दिल्ली जिंकणार? अरुण जेटली स्टेडियमवर आज उभय संघांत लढत; अक्षरची दुहेरी कसोटी

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम आता मध्यावर येऊन ठेपला आहे. शनिवारी सर्व संघांचे प्रत्येकी सात सामने पूर्ण होतील.

Swapnil S

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम आता मध्यावर येऊन ठेपला आहे. शनिवारी सर्व संघांचे प्रत्येकी सात सामने पूर्ण होतील. शनिवारी दुपारी होणाऱ्या लढतीत अग्रस्थानी असलेला पंजाब किंग्ज संघ सातत्याने संघर्ष करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सशी दोन हात करेल. त्यामुळे पंजाबचे पुत्तर सलग सहावा विजय नोंदवणार की दिल्लीचा अक्षर पटेल दुहेरी कसोटीत उत्तीर्ण होणार, हे पाहणे रंजक ठरेल.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. आता प्रत्येक संघाचे ७ सामने झाल्यानंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होणार आहे. त्यामुळेच आयपीएलचा ज्वर हळूहळू वाढणार आहे.

दरम्यान, मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबने आतापर्यंत सहापैकी पाच लढती जिंकल्या असून त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे सर्वाधिक ११ गुणांसह हा संघ गुणतालिकेत अग्रस्थानी विराजमान आहे. आता अरुण जेटली स्टेडियमवर (पूर्वीचे कोटला) दिल्लीला नमवून ते बाद फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकण्यास आतुर असतील. अनकॅप्ड खेळाडू ही पंजाबची ताकद असून त्यांची गोलंदाजीदेखील सध्या लयीत आहे.

प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, शशांक सिंग व नेहल वधेरा या आक्रमक फलंदाजांना साथीला घेत श्रेयस फलंदाजीची धुरा वाहत आहे. तसेच कूपर कोनोली, मार्कस स्टोइनिसदेखील गरजेनुसार फटकेबाजी करत आहेत. गोलंदाजीत अर्शदीप सिंग व मार्को यान्सेन या डावखुऱ्यांची जोडी पंजाबची ताकद आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहल संघर्ष करत असला तरी पंजाबला त्याचा अद्याप फारसा फटका बसलेला नाही. एकूणच कागदासह मैदानातही पंजाबचा संघ समतोल असून त्यांना रोखणे दिल्लीसाठी कठीण जाऊ शकते.

दुसरीकडे अक्षरच्या नेतृत्वात दिल्लीने सहापैकी तीन लढती जिंकल्या आहेत. गेल्या सामन्यात त्यांना हैदराबादकडून दारुण पराभव पत्करावा लागला, कारण दिल्लीच्या गोलंदाजांनी तब्बल २४२ धावा लुटल्या. आता घरच्या मैदानात खेळताना दिल्लीचा संघ चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. तसेच अक्षर गोलंदाजीत स्वत:सह कुलदीप यादवची ४ षटके पूर्ण करत नसल्याने त्याच्यावर टीका होत आहे. फलंदाजीतही नितीश राणा व पथुम निसांका यांचे अपयश संघाला महागात पडत आहे. अशा स्थितीत पृथ्वी शॉ किंवा अभिषेक पोरेलला संधी मिळू शकते. लुंगी एन्गिडी, नटराजन यांच्यावर दिल्लीची वेगवान गोलंदाजी अवलंबून आहे. अक्षरला फलंदाजीतही तूर्तास छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे एकूणच त्याच्या दुहेरी कौशल्याचा कस लागणार आहे.

उभय संघांत आतापर्यंत ३५ सामने झाले आहेत. त्यांपैकी पंजाबने १७, तर दिल्लीनेदेखील १७ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आकडेवारीनुसार दोन्ही संघांत नेहमीच कांटे की टक्कर झाल्याचे स्पष्ट होते.

खेळपट्टीचा अंदाज

दिल्ली येथे आतापर्यंत काहीशा संथ खेळपट्टीवर बहुतांश सामने झाले आहेत. त्यामुळे नाणेफेकीचा कौल फारसा निर्णायक नसेल. दोन्ही संघांतील गोलंदाजांना येथे सहाय्य लाभू शकते. मैदान आकाराने लहान असल्याने येथे चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे.

प्रतिस्पर्धी संघ

दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, आकिब नबी, डेव्हिड मिलर, दुश्मंता चमीरा, करुण नायर, के. एल. राहुल, कुलदीप यादव, कायले जेमिसन, लुंगी एन्गिडी, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार, नितीश राणा, पथुम निसांका, पृथ्वी शॉ, साहिल पारेख, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, रेहान अहमद.

पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, ड्वारशुइस, कूपर कोनोली, हर्नूर पन्नू, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मिचेल ओवन, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, विजयकुमार वैशाख, विशाल निशाद, विष्णू विनोद, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.

वेळ : दुपारी ३.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, २ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार