नवी दिल्ली : पंजाब किंग्सने शनिवारी टी-२० क्रिकेटच्या इतिहासात नव्या विक्रमाची नोंद केली. दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी दिलेले २६५ धावांचे भलेमोठे लक्ष्य पंजाबने ६ विकेट्स राखून यशस्वीपणे पार केले. टी-२० क्रिकेटमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धावांचा यशस्वी पाठलाग ठरला आहे. या विजयासह पंजाबचा संघ ११ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी असून चालू हंगामात अद्यापही अजिंक्य आहे. दिल्लीच्या लोकेश राहुलची नाबाद १५२ धावांची खेळी मात्र व्यर्थ ठरली.
पंजाबने आपल्या पूर्वीच्या विक्रमाला शनिवारी मागे टाकले. यापूर्वीचा २६२ धावांच्या पाठलागाचा विक्रमही पंजाबच्याच नावे होता, जो त्यांनी २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध केला होता. प्रथम फलंदाजी करताना यजमान दिल्ली कॅपिटल्सने २ विकेट्सच्या मोबदल्यात २६४ धावांचा डोंगर उभा केला. के. एल. राहुलने ६७चेंडूंत १५२ धावांची झंझावाती खेळी केली. आयपीएल इतिहासातील ही तिसरी सर्वोच्च आणि भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. राहुलने ख्रिस गेल (१७५) आणि ब्रेंडन मॅकक्युलम (१५८) यांच्यानंतर १५० धावांचा टप्पा ओलांडणारा तिसरा फलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याने नितीश राणा (९१) याच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी २२० धावांची भागीदारी केली, जी आयपीएलमधील दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली. राणाने ४४ चेंडूंत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ही धावसंख्या गाठली.
विजयाचा पाठलाग करताना पंजाबच्या प्रभसिमरन सिंग (७६) आणि प्रियांश आर्य (७३) या सलामीच्या जोडीने अवघ्या ४२ चेंडूंत १२६ धावांची भागीदारी करत विजयाचा भक्कम पाया रचला. प्रभसिमरनने मुकेश कुमारच्या एकाच षटकांत सहा चौकार ठोकले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने ३६ चेंडूंत नाबाद ७१ धावांची खेळी करत ७ चेंडू राखून पंजाबला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या सामन्यात एकूण ४९ चौकार आणि ३३ षटकार मारले गेले.
दरम्यान, प्रियांश आर्यचा झेल घेण्याच्या प्रयत्नात दिल्लीचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी याच्या डोक्याला दुखापत झाली. त्याला मैदानातून स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले, ज्यामुळे सामना १५ मिनिटे थांबला होता.
लुंगी एनगिडी गंभीर जखमी
दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला. मैदानावर फिजिओथेरपिस्टनी येऊन त्याची विचारपूस केली, त्यानंतर स्ट्रेचरवरून त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. तसेच तातडीने रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंजाब किंग्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही मैदानावर धाव घेत त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. तिसऱ्या षटकात प्रियांश आर्याच्या शॉटवर 'मिड-ऑफ 'वरून धावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र संतुलन बिघडल्यामुळे तो जोरात खाली पडला. खाली पडताना त्याच्या डोक्याचा मागचा भाग जमिनीवर जोरात आदळला.