पॅरिस : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू हिने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या चुरशीच्या लढतीत सिंधूने जपानच्या हिना अकेचीचा पराभव केला. यंदाच्या वर्षातील सुपर ७५० दर्जाच्या स्पर्धेतील तिची ही दुसरी अंतिम फेरी आहे.
३१ वर्षीय सिंधूने जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानावर असलेल्या २१ वर्षीय अकेची हिच्यावर २१-१०, २०-२२, २१-१६ अशी मात केली. एक तास १३ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात तिने संयम आणि अनुभवाच्या जोरावर विजय मिळवला. जुलैमध्ये सिंधूने जपान ओपन सुपर ७५० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
"हा सामना जिंकून अंतिम फेरीत पोहोचता आले, याचा मला थोडा आनंद आहे. मात्र, अजून काम पूर्ण झालेले नाही. मला आणखी एका सामन्यासाठी पुन्हा लक्ष केंद्रित करावे लागेल," असे सिंधूने विजयानंतर सांगितले.
अकेचीने या स्पर्धेत यापूर्वी चीनच्या वांग झी यी आणि पुतरी कुसुमा वारदानी यांना पराभूत केले होते. दिशाभूल करणारे फटके आणि भक्कम बचावाच्या जोरावर तिने सिंधूला कडवी झुंज दिली. मात्र, निर्णायक गेममध्ये सिंधूने आपला अनुभव पणाला लावत विजय मिळवला. अंतिम फेरीत सिंधूसमोर दक्षिण कोरियाची जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू अन से यंग हिचे आव्हान असेल.
"मला अन से यंगविरुद्ध चांगली आणि कडवी लढत द्यावी लागेल. प्रत्येक गुण महत्त्वाचा आहे. आम्ही अनेकदा एकमेकांविरुद्ध खेळलो आहोत आणि ती सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. सध्या ती सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. मात्र, उद्याचा दिवस वेगळा असेल. मला फक्त मैदानावर उतरून माझी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे," असे सिंधूने सांगितले.
पहिल्या गेममध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळाली. गुणफलक ४-४ आणि ८-८ असा बरोबरीत होता. मध्यंतराला सिंधूने ११-९ अशी आघाडी घेतली. त्यानंतर तिने खेळावर पूर्ण वर्चस्व मिळवत अखेरच्या १२ पैकी ११ गुण जिंकले आणि अवघ्या १८ मिनिटांत २१-१० असा पहिला गेम जिंकला.
माजी जागतिक विजेत्या सिंधूला दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीला चार गुणांची पिछाडी सहन करावी लागली. मात्र, तिने खेळाचा वेग वाढवत ७-७ अशी बरोबरी साधली. १६-१६ अशा बरोबरीनंतर अकेचीने पुन्हा जोरदार पुनरागमन करत गेम पॉइंट मिळवला. सिंधूचा फटका कोर्टबाहेर गेल्याने अकेचीने २२-२० असा गेम जिंकत सामना निर्णायक तिसऱ्या गेममध्ये नेला.
निर्णायक गेममध्ये सिंधूने ५-३ अशी आघाडी घेतली. मध्यंतराला सिंधूकडे दोन गुणांची आघाडी राखली. क्रॉसकोर्ट परतीचा फटका आणि नेटजवळील सुरेख खेळीच्या जोरावर सिंधूने आघाडी वाढवली. ३८ फटक्यांच्या दमछाक करणाऱ्या रॅलीनंतर सिंधूने १८-१६ अशी आघाडी घेतली. नेटजवळील आणखी एका सुरेख फटक्याने सिंधू विजयाच्या जवळ पोहोचली. अकेचीचा पुढील फटका कोर्टाबाहेर गेल्याने सिंधूला चार मॅच पॉइंट मिळाले. तिने क्रॉसकोर्ट स्मॅश मारत सामना जिंकला.
प्रशिक्षणाच्या पद्धतीत बदल
गेल्या काही काळातील दुखापती आणि कामगिरीतील चढ-उतारांवर मात करण्यासाठी नव्या सहाय्यक पथकाची निवड आणि प्रशिक्षणातील अधिक शास्त्रशुद्ध दृष्टिकोन उपयुक्त ठरल्याचे सिंधूने सांगितले. "गेल्या दीड वर्षात अनेक चढउतार आले. हा काळ माझ्यासाठी कठीण होता. त्यामुळे पुन्हा सुरुवातीपासून काम करणे आणि शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या आपण नेमके कुठे आहोत, हे समजून घेणे महत्त्वाचे होते. त्यासाठी आम्ही एक नवे पथक तयार केले. क्रीडा विज्ञान, फिजिओथेरपी आणि शारीरिक प्रशिक्षणासाठी आम्ही नवे पथक तयार केले," असे तिने स्पष्ट केले.