नॉर्वे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचे कार्लसनवर पुन्हा वर्चस्व! तिसऱ्या स्थानी झेप घेतल्याने जेतेपदाच्या शर्यतीत कायम; गुकेशचे आव्हान मात्र संपुष्टात Photo : X
क्रीडा

नॉर्वे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचे कार्लसनवर पुन्हा वर्चस्व! तिसऱ्या स्थानी झेप घेतल्याने जेतेपदाच्या शर्यतीत कायम; गुकेशचे आव्हान मात्र संपुष्टात

भारताचा तरुण ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी रचली. २० वर्षीय प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला त्याच्याच मायभूमीत क्लासिकल गेममध्ये दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का दिला. या खळबळजनक विजयामुळे प्रज्ञानंदचे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पहिले भारतीय जेतेपद मिळवण्याचे स्वप्न टिकून आहे.

Swapnil S

ओस्लो : भारताचा तरुण ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी रचली. २० वर्षीय प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला त्याच्याच मायभूमीत क्लासिकल गेममध्ये दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का दिला. या खळबळजनक विजयामुळे प्रज्ञानंदचे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पहिले भारतीय जेतेपद मिळवण्याचे स्वप्न टिकून आहे.

दुसरीकडे जागतिक विजेता डी. गुकेश याला आठव्या फेरीत फ्रान्सच्या अलिरेझा फिरोज्जाकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याचे जेतेपदाचे आव्हान संपुष्टात आले आहे. गुकेश २०२४च्या जागतिक जेतेपदानंतर खराब फॉर्मात असून तो केवळ ८ गुणांसह गुणतालिकेत सर्वात तळाला आहे. या प्रतिष्ठित डबल राउंड रॉबिन स्पर्धेत प्रज्ञानंदने या वर्षात कार्लसनला क्लासिकल गेममध्ये दोनदा पराभूत करणारा एकमेव खेळाडू बनण्याचा बहुमान मिळवला आहे. स्पर्धा संपायला दोन फेऱ्या बाकी असताना या विजयामुळे प्रज्ञानंद १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अलिरेझा १३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून अमेरिकेचा वेस्ली सो १४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

वेस्ली सो याने आर्मगेडन टाय-ब्रेकमध्ये जर्मनीच्या विन्सेंट केमरचा पराभव केला. कार्लसनच्या खराब फॉर्माचा सिलसिला कायम राहिल्याने त्याचे आठवे नॉर्वे चेस जेतेपद मिळवण्याचे स्वप्न जवळपास भंगले आहे. पाच वेळचा जागतिक विजेता कार्लसन केवळ ९ गुणांवर अडकला असून उर्वरित दोन्ही सामने जिंकूनही त्याचे पुनरागमन कठीण आहे. कार्लसनला प्रज्ञानंदकडून या मोहिमेत एकूण तिसरा पराभव स्वीकारावा लागला आहे, कारण प्रज्ञानंदने २०२४च्या आवृत्तीतही त्याला पराभूत केले होते.

मॅग्नस कार्लसनविरुद्ध काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या प्रज्ञानंदने सामन्यात वजीर आणि उंटाच्या मदतीने अतिरिक्त प्यादा मिळवत दबावाची स्थिती निर्माण केली. हा सामना बरोबरीकडे झुकणारा असतानाही प्रज्ञानंदने पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या कार्लसनवर वेळेचे व पटावरील दडपण कायम ठेवले, ज्यात कार्लसन अखेर चुकला. स्पर्धेच्या दृष्टीने हा विजय कार्लसनविरुद्ध खेळण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा होता, असे प्रज्ञानंदने सामन्यानंतर सांगितले. त्याने बुद्धिबळ जगतात नेतृत्व बदल होत असल्याचा दावा फेटाळताना कार्लसन हा अजूनही अत्यंत मजबूत खेळाडू असून त्याच्या नावावर २० जागतिक जेतेपदे असल्याचे स्पष्ट केले. या स्पर्धेत वेळेच्या दडपणाखाली कार्लसनच्या चुका झाल्याचे त्याने नमूद केले. नवव्या फेरीत प्रज्ञानंदचा सामना गुकेशविरुद्ध होणार आहे.

महिलांच्या विभागात बिबिसारा आसाउबायेवाने जेतेपदाच्या शर्यतीत आपली पकड मजबूत केली आहे. कझाकस्तानच्या या खेळाडूने भारताच्या दिव्या देशमुखचा पराभव केला, जी वेळेच्या दडपणामुळे अडचणीत आली होती. चीनच्या झू जिनरने जागतिक विजेत्या जू वेनजुनचा पराभव करून दिव्यासोबत १० गुणांची बरोबरी साधली आहे. गतविजेती अण्णा मुझीचुक आणि भारताची कोनेरू हम्पी यांच्यातील क्लासिकल सामना बरोबरीत सुटल्यानंतर आर्मगेडन सामन्यात हम्पीने बोनस गुण मिळवले. सध्या बिबिसारा १५.५ गुणांसह आघाडीवर असून मुझीचुक १०.५ गुणांवर आहे.

एकूणच आता स्पर्धा रंगतदार टप्प्यावर असून प्रज्ञानंदकडे भारतीयांचे लक्ष लागून आहे.

कार्लसनची कधीच भीती नव्हती!

कार्लसनला सामोरे जाताना आपल्याला भीती वाटत नाही, तर उलट त्याच्याविरुद्ध खेळताना चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रज्ञानंदने सांगितले. क्लासिकल प्रकारात कार्लसनचा पराभव करत प्रज्ञानंदने ऐतिहासिक विजेतेपदाच्या दिशेने आपले पाऊल टाकले आहे. कार्लसनला कोणत्याही प्रकारात पराभूत करणे आनंददायी असते, परंतु क्लासिकल प्रकारात तीन गुण मिळत असल्याने स्पर्धेच्या या टप्प्यावर हा विजय मिळवणे अधिक महत्त्वाचे होते, असे प्रज्ञानंद म्हणाला. प्रज्ञानंदने कार्लसनवर मिळवलेला हा तिसरा क्लासिकल विजय आहे. त्याने मागच्या आठवड्यात पांढऱ्या मोहऱ्यांनी, तर मंगळवारी काळ्या मोहऱ्यांसह खेळताना बाजी मारली.

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग

Bhayandar : सूर्या प्रकल्पाच्या पाइपलाइन टेस्टिंगदरम्यान स्फोट; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

Navi Mumbai : सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच; खारघर, कळंबोली, तळोजात पाणीटंचाईचे संकट

मध्य रेल्वेवर दररोज ११ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवासी