क्रीडा

ऑस्ट्रेलियन ओपनमधून राफेल नदालची माघार; एका स्पर्धेनंतरच पुन्हा दुखापत

आता १४ वेळा विजेता ठरलेल्या आणि आपल्या आवडत्या फ्रेंच ओपन स्पर्धेवर नदालने लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे.

Swapnil S

मेलबर्न : तब्बल १२ महिन्यांनंतर त्याने टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. पण ‘लाल मातीचा बादशाह’ म्हणवणाऱ्या राफेल नदालला फक्त एका स्पर्धेनंतर पुन्हा माघारी परतावे लागले. दुखापतीमुळे नदालने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेतून माघार घेतली आहे.

नदाल म्हणाला की, “गेल्या वर्षी नितंबाच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया केल्यानंतर पुन्हा तीच दुखापत उफाळून आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावेळी खूपच जास्त वेदना होत आहेत. मेलबर्नमध्ये एमआरआय स्कॅन काढण्यात आल्यानंतर त्यात स्नायूंची समस्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता स्पेनमध्ये परतल्यानंतर त्यावर उपचार करण्यात येतील. तूर्तास, ग्रँडस्लॅमसारख्या स्पर्धांमध्ये खेळण्याइतपत मी तंदुरुस्त नाही.”

नदालला शुक्रवारी ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जॉर्डन थॉम्पसन याच्याकडून पराभूत व्हावे लागले. तब्बल एका वर्षाच्या कालावधीनंतर त्याने या स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय पुनरागमन केले होते. पाच दिवसांपूर्वी पुनरागमन करताना नदालने दोन सामने जिंकले होते. “कमबॅक करण्यासाठी मी कठोर मेहनत घेतली होती. तीन महिन्यांत उच्च दर्जाचा फिटनेस राखण्याकडे माझे लक्ष होते. मात्र मेलबर्नसारख्या मला नेहमीच पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांसमोर खेळता येणार नाही, हे दुर्दैवाने सांगावे लागते. ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्याची माझी मनापासून इच्छा होती. पण ऑस्ट्रेलियात दोन सामने खेळायला मिळाले, हेच माझ्यासाठी खूप आहे,” असेही नदालने ‘एक्स’वर म्हटले आहे.

आता १४ वेळा विजेता ठरलेल्या आणि आपल्या आवडत्या फ्रेंच ओपन स्पर्धेवर नदालने लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेला अद्याप पाच महिने शिल्लक असले तरी तो आता फिटनेस राखण्याचा प्रयत्न करणार आहे.

Bihar Election Results 2025 Live Updates: एनडीए २०० च्या पार; "ही ज्ञानेश कुमार यांची जादू"; काँग्रेसच्या भूपेश बघेल यांची टीका

Assembly Bypolls Result 2025 : अंतापाठोपाठ जुबली हिल्समध्येही काँग्रेसचा दमदार विजय; बघा अन्य ६ जागांवर कोणाची बाजी?

सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन; ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Red Fort Blast : दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी मोठी कारवाई; मास्टरमाईंडचे घर सुरक्षा दलाने उडवले

CSMT : लाल बॅगेचं गूढ उलगडलं! कोणताही धोका नाही, बॅगेत आढळल्या 'या' वस्तू