मुंबई : डावखुरा फिरकीपटू शम्स मुलाणीने दुसऱ्या डावात ४ आणि लढतीत एकूण १० बळी पटकावले. त्यामुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या साखळी सामन्यात आंध्र प्रदेशचा तब्बल १० गडी राखून सहज फडशा पाडला. मुंबईने सलग दुसऱ्या लढतीत बोनस गुणासह विजय मिळवल्याने त्यांनी ब-गटात अग्रस्थान मिळवले आहे.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईच्या खात्यात दोन विजयांचे एकूण १४ गुण जमा आहेत. पहिल्या सामन्यात मुंबईने बिहारचा धुव्वा उडवला होता. रणजी स्पर्धेत डावाने लढत जिंकल्यास अथवा १० गडी राखून लक्ष्य गाठल्यास बोनस गुण म्हणजेच एकंदर ६ ऐवजी ७ गुण देण्यात येतात. आंध्र प्रदेशने दिलेले ३४ धावांचे माफक लक्ष्य मुंबईने ८.४ षटकांत गाठले. जय बिस्ता (नाबाद २६) व भुपेन लालवाणी (नाबाद ८) यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्यापूर्वी, रविवारच्या ५ बाद १६४ धावांवरून पुढे खेळताना आंध्र प्रदेशला आणखी ४७ धावांची पिछाडी भरून काढायची होती. शेख रशीद (६६) व नितीश रेड्डी (३०) यांच्या योगदानामुळे त्यांनी मुंबईला डावाने विजय मिळवून दिला नाही. मात्र मुलाणी व रॉयस्टन डायस यांच्यापुढे आंध्रचा दुसरा डाव २४४ धावांत आटोपला. त्यामुळे मुंबईपुढे फक्त ३४ धावांचे लक्ष्य उभे ठाकले. आता १९ जानेवारीपासून मुंबईची केरळशी गाठ पडेल.
महाराष्ट्राला पहिल्या डावातील आघाडीचे ३ गुण
केदार जाधवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्राला अ-गटातील दुसऱ्या साखळी सामन्यात झारखंडविरुद्धची लढत अनिर्णित राखण्यात यश आले. महाराष्ट्राने पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळवले. सध्या ते गटात दुसऱ्या स्थानी असून १९ जानेवारीपासून त्यांचा राजस्थानशी मुकाबला होईल. झारखंडने पहिल्या डावात ४०७ धावा केल्यावर महाराष्ट्राने तब्बल ५ बाद ६०१ धावांचा डोंगर उभारून डाव घोषित केला. त्यांच्याकडून केदार (१८२), पवन शाह (१३६) व अंकित बावणे (१३१) यांनी शतके झळकावली.