क्रीडा

Ranji Trophy: मुंबईची उपांत्यपूर्व फेरीत धडक; हैदराबादवर ९ गडी राखून शानदार विजय; फिरकीपटू मुशीरचे ५ बळी

राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील या सामन्यात फॉलोऑन पत्करणाऱ्या हैदराबादचा दुसरा डाव ६९.५ षटकांत ३०२ धावांत आटोपला. त्यामुळे मुंबईपुढे विजयासाठी अवघ्या १० धावांचे लक्ष्य उभे ठाकले.

Swapnil S

हैदराबाद : डावखुरा फिरकीपटू मुशीर खानने (७९ धावांत ५ बळी) दुसऱ्या डावात पाच बळी मिळवले. त्यामुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत हैदराबादचा ९ गडी राखून सहज पराभव केला. या विजयासह मुंबईने ड-गटात अग्रस्थान कायम राखतानाच सर्वप्रथम उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले.

राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील या सामन्यात फॉलोऑन पत्करणाऱ्या हैदराबादचा दुसरा डाव ६९.५ षटकांत ३०२ धावांत आटोपला. त्यामुळे मुंबईपुढे विजयासाठी अवघ्या १० धावांचे लक्ष्य उभे ठाकले. एका डावाच्या फरकाने किंवा १० गडी राखून विजय मिळवल्यास विजयाच्या सहा गुणांसह बोनसचा अतिरिक्त एक गुण बहाल केला जातो. मात्र मुंबईने ३.२ षटकांत १० धावांचे लक्ष्य गाठताना अखिल हेरवाडकरचा (४) बळी गमावला. आकाश आनंद (नाबाद ५) व हिमांशू सिंग (नाबाद १) यांनी चौथ्या षटकात मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

पहिल्या डावात द्विशतक साकारणाऱ्या सर्फराझ खानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मुंबईची आता अखेरच्या साखळी लढतीत दिल्लीशी गाठ पडणार असून २९ जानेवारीपासून ही लढत बीकेसी येथे होईल. सिद्धेश लाड मुंबईचे नेतृत्वत करत असून तूर्तास मुंबईचा संघ ड-गटात ३० गुणांसह अग्रस्थानी आहे. मुंबईने ६ पैकी चार सामने जिंकले असून २ लढती अनिर्णित राहिले आहेत. मुंबईने मिळवलेल्या चारपैकी दोन विजय हे बोनस गुणासह आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यात ३० गुण जमा आहेत.

गेल्या वेळेसप्रमाणे यावेळीसुद्धा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या काळात पार पडला. मग दरम्यानच्या काळात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा व सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा रंगली. आता २२ जानेवारीपासून रणजीचा दुसरा टप्पा सुरू झाला. २८ फेब्रुवारीला रणजी स्पर्धा समाप्त होईल. तूर्तास सर्व संघांचे पाच साखळी सामने झाले असून उर्वरित दोन लढती शिल्लक आहेत. त्यानंतर बाद फेरीला प्रारंभहोईल.

गतवेळेस विदर्भाने केरळला नमवून तिसऱ्यांदा रणजी करंडक उंचावला होता. त्यामुळे त्यांच्यापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल. स्पर्धेत यंदाही ३८ संघांचा समावेश असून त्यापैकी ३२ संघांची चार एलिट गटात (एका गटात आठ संघ), तर उरलेल्या ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ उपांत्यपूर्व फेरी गाठणार आहेत.

दरम्यान, मुंबई-हैदराबाद लढतीत प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात ५६० धावांचा डोंगर उभारला. सर्फराझने द्विशतक, तर सिद्धेशने शतक साकारले. मग हैदराबाद २६७धावांत गारद झाल्यामुळे मुंबईने त्यांच्यावर फॉलोऑन लादला. ते तब्बल २९३ धावांनी पिछाडीवर होते. दुसऱ्या डावात हैदराबादने ३०२ धावा केल्या. चमा मिलिंदने ८५ धावांची झुंज दिली. मात्र त्यांना फक्त १० धावांचीच आघाडी घेता आली. मुशीरने पाच, मोहित अवस्थीने ३, तर ओमकार तरमळेने २ बळी मिळवले. मग मुंबईने १० धावांचे लक्ष्य सहज गाठून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मुंबईला आता ४३वे रणजी जेतेपद खुणावत आहे. २०२४मध्ये त्यांनी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ४२व्यांदा ही स्पर्धा जिंकली होती.

संक्षिप्त धावफलक

  • मुंबई (पहिला डाव) : ५६०

  • हैदराबाद (पहिला डाव): २६७

  • हैदराबाद (दुसरा डाव) : ३०२ (चमा मिलिंद ८५; मुशीर खान ५/७९)

  • मुंबई (दुसरा डाव): ३.२ षटकांत १ बाद १२ (आकाश आनंद नाबाद ५)

सामनावीर : सर्फराझ खान

भारताची रशिया, यूएईकडून तेल खरेदीत मोठी वाढ; होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्ववत होण्यापूर्वीचा दिलासा

Mumbai : एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशय कर्करोगावर नियंत्रण; केईएम रुग्णालयात २८२ लाभार्थ्यांना एचपीव्हीची मात्रा

Mumbai Rain : मेघगर्जनेसह पावसाचे जोरदार पुनरागमन! वांद्रे-वरळीसह अनेक भागांत मुसळधार सरी, ऑरेंज अलर्ट जारी

'मुलगा अडथळा ठरतोय'; प्रियकराच्या सांगण्यावरून आईने घेतला दोन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव

NEET UG 2026 Re-Exam : फ्लश टँकमध्ये मोबाईल लपवून परीक्षेत कॉपीचा प्रयत्न; १८ वर्षीय विद्यार्थ्याला अटक