हैदराबाद : प्रतिभावान फलंदाज सर्फराझ खानने शुक्रवारी प्रथम श्रेणी कारकीर्दीतील पाचवे द्विशतक साकारताना २१९ चेंडूंत २२७ धावा फटकावल्या. त्याच्या द्विशतकाच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत हैदराबादविरुद्ध ड-गटातील साखळी सामन्यात पहिल्या डावात १२३.२ षटकांत ५६० धावांचा डोंगर उभारला.
राजीव गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या ड-गटातील या सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर हैदराबादने पहिल्या डावात ४१ षटकांत २ बाद १३८ धावा केल्या आहेत. ते अद्याप ४२२ धावांनी पिछाडीवर असून राहुल सिंग ८२, तर कोडिमेला हिमतेजा ४० धावांवर नाबाद आहे. सिद्धेश लाड (१०४) व सुवेद पारकर (७५) यांनीही मुंबईच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशी मुंबईचा संघ हैदराबादवर मोठी आघाडी घेण्यासाठी उत्सुक असेल.
गतवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या काळात पार पडला. मग दरम्यानच्या काळात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा व सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा रंगली. आता २२ जानेवारीपासून रणजीचा दुसरा टप्पा सुरू झाला. २८ फेब्रुवारीला रणजी स्पर्धा समाप्त होईल. तूर्तास सर्व संघांचे पाच साखळी सामने झाले असून उर्वरित दोन लढती शिल्लक आहेत. त्यानंतर बाद फेरीला प्रारंभ होईल.
गतवेळेस विदर्भाने केरळला नमवून तिसऱ्यांदा रणजी करंडक उंचावला होता. त्यामुळे त्यांच्यापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल. स्पर्धेत यंदाही ३८ संघांचा समावेश असून त्यापैकी ३२ संघांची चार एलिट गटात (एका गटात आठ संघ), तर उरलेल्या ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ उपांत्यपूर्व फेरी गाठतील. शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे अनुपलब्ध असल्याने सिद्धेश लाडकडे मुंबईचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. ड-गटात मुंबईने पाचपैकी तीन सामने जिंकले असून २ लढती अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यात २४ गुण जमा आहेत.
दरम्यान, लढतीच्या पहिल्या दिवशी मुंबईने ४ बाद ३३२ धावा केल्या होत्या. तेथून पुढे शुक्रवारी दुसऱ्या दिवसाला प्रारंभ करताना सर्फराझने फटकेबाजी कायम राखली. हिमांशू सिंग (१) लगेच बाद झाल्यावर त्याने सुवेदच्या साथीने सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी रचली. सर्फराझने १९ चौकार व ९ षटकारांसह यंदाच्या हंगामातील पहिले द्विशतक साकारले. २८ वर्षीय सर्फराझने काही दिवसांपूर्वी विजय हजारे व सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही शतक झळकावले होते.
दुसरीकडे सुवेदने ११ चौकार व १ षटकारासह तिसरे अर्धशतक साकारले. रक्षण रेड्डीने सर्फराझचा १११व्या षटकात अडसर दूर केला. मग अर्थव अंकोलेकर (नाबाद ३५) व आकाश पारकर (१४) यांच्या योगदानासह मुंबईने साडेपाचशे धावांचा पल्ला गाठला. सुवेदला मोहम्मद सिराजने ७५ धावांवर धावचीत केले. हैदराबादसाठी रक्षणने चार बळी मिळवले.
त्यानंतर हिमांशू व तुषार देशपांडे यांनी हैदराबादचे सलामीवीर अभिराथ रेड्डी (४), अमन राव (७) यांना स्वस्तात बाद केले. मात्र राहुल व हिमतेजा यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०० धावांची अभेद्य भागीदारी रचून हैदराबादला सावरत १३८ धावांपर्यंत नेले. तिसऱ्या दिवशी हैदराबादच्या फलंदाजांकडे लक्ष असेल.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : १२३.२ षटकांत सर्व बाद ५६० (सर्फराझ खान २२७, सिद्धेश लाड १०४, सुवेद पारकर ७५; रक्षण रेड्डी ४/१०७)
हैदराबाद (पहिला डाव) : ४१ षटकांत २ बाद १३८ (राहुल सिंग नाबाद ८२, कोडिमेला हिमतेजा ४०; हिमांशू सिंग १/१८)
गिल पुन्हा अपयशी; जडेजाची चमक
ब-गटात एकीकडे पंजाब आणि सौराष्ट्र आमनेसामने आल्याने शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा यांच्याकडे लक्ष लागून होते. मात्र भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार गिल दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. परिणामी पंजाबच्या पदरीही निराशा पडली. सौराष्ट्रने दुसऱ्याच दिवशी त्यांना तब्बल १९४ धावांनी धूळ चारली. गिलने पहिल्या डावात शून्य, तर दुसऱ्या डावात १४ धावा केल्या. जडेजाने दुसऱ्या डावात ४६ धावा करतानाच २ बळीही मिळवले. ३२० धावांचा पाठलाग करताना पंजाबचा दुसरा डाव १२५ धावांत आटोपला. त्यामुळे पंजाबची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे, तर सौराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्राला पहिल्या डावात आघाडी
ब-गटात तिसऱ्या स्थानी असलेल्या महाराष्ट्राने गोव्याविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसअखेर गोव्याच्या २०९ धावांच्या प्रत्युत्तरात महाराष्ट्राने ९१ षटकांत ८ बाद ३०६ धावा केल्या आहेत. सौरभ नवाले ९५ धावांवर नाबाद असून त्याच्यासह विकी ओस्तवाल १३ धावांवर टिकून आहे. त्यामुळे महाराष्ट्राकडे ९७ धावांची आघाडी आहे. ऋतुराज गायकवाडने ६६ धावांचे योगदान दिले. पृथ्वी शॉ (३१) चांगल्या सुरुवातीनंतर बाद झाला.
ठाकरेमुळे विदर्भाला आघाडी
वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरेसह (३३ धावांत २ बळी) अन्य गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. त्यामुळे गतविजेत्या विदर्भाने अ-गटात आंध्र प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात ७१ धावांची आघाडी घेतली आहे. विदर्भाच्या २९५ धावांच्या प्रत्युत्तरात आंध्रचा संघ २२८ धावांत गारद झाला. अभिषेक रेड्डीने ७३, तर सौरभ कुमारने ६२ धावांची झुंज दिली. दर्शन नळकांडे, नचिकेत भुते यांनीही दोन बळी मिळवले. मग दुसऱ्या दिवसअखेर विदर्भाने दुसऱ्या डावात बिनबाद ४ धावा केल्या आहेत. त्यामुळे विदर्भाने लढतीवर भक्कम पकड मिळवली आहे.