IPL 2026 : जोश-भुवीपुढे दिल्लीची दैना! अवघ्या ७५ धावांत संघ गारद; बंगळुरूचा ९ गडी राखून शानदार विजय 
क्रीडा

IPL 2026 : जोश-भुवीपुढे दिल्लीची दैना! अवघ्या ७५ धावांत संघ गारद; बंगळुरूचा ९ गडी राखून शानदार विजय

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या भेदक माऱ्यापुढे दिल्ली कॅपिटल्सची दैना उडाली.

Swapnil S

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या भेदक माऱ्यापुढे दिल्ली कॅपिटल्सची दैना उडाली. जोश हेझलवूड (१२ धावांत ४ बळी) आणि भुवनेश्वर कुमार (५ धावांत ३ बळी) या वेगवान जोडीने केलेल्या प्रभावी माऱ्यापुढे दिल्लीचा संघ १६.३ षटकांत ७५ धावांत गारद झाला. त्यानंतर बंगळुरूने हे लक्ष्य ९ गडी व ८१ चेंडू राखून सहज गाठत स्पर्धेतील सहावा विजय नोंदवला.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे.

दरम्यान, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. अनुभवी भुवनेश्वरने दुसऱ्याच चेंडूवर हा निर्णय सार्थ ठरवून पदार्पणवीर साहिल परखचा शून्यावर त्रिफळा उडवला. दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियन हेझलवूडने के. एल. राहुल व समीर रिझ‌वी यांना लागोपाठच्या चेंडूवर माघारी पाठवून दिल्लीची दैना उडवली. राहुल १ धावेवर बाद झाला, तर रिझवी भोपळा फोडू शकला नाही. तिसऱ्या षटकात भुवनेश्वरने आणखी दोन बळी मिळवताना ट्रिस्टन स्टब्स (५) व कर्णधार अक्षर पटेल (०) यांना तंबूत धाडले. चौथ्या षटकात नितीश राणाला (१) बाऊन्सरवर चकवून हेझलवूडने दिल्लीची ८ बाद ६ धावा अशी केविलवाणी अवस्था केली. त्यामुळे दिल्लीचा संघ एकवेळ आयपीएलमधील निचांकी धावसंख्या नोंदवणार का, असे वाटू लागले. बंगळुरूच्याच नावे आयपीएलमधील निचांकी धावसंख्या आहे. ते कोलकाताविरुद्ध २०१७मध्ये ४९ धावांत गारद झाले होते.

मात्र इम्पॅक्टर प्लेयर म्हणून आलेला अभिषेक पोरेल व डेव्हिड मिलर या जोडीने दिल्लीला सावरले. दोघांनी काही चेंडू खेळून काढल्यावर आक्रमण सुरू केली. त्यांनी सातव्या विकेटसाठी ३५ धावांची भर घातली. ही जोडी दिल्लीला सावरणार असे वाटत असतानाच रसिक सलामने मिलरचा १९ धावांवर अडसर दूर केला. तरी पोरेलने मात्र एक बाजू लावून धरत दिल्लीला किमान अर्धशतक गाठून दिले. दुसऱ्या बाजूने कृणाल पंड्याने कायले जेमिसन (१२), तर सूयश शर्माने कुलदीप यादवला (३) बाद केले. अखेरीस हेझलवूडने १७व्या षटकात पोरेलचा ३० धावांवर त्रिफळा उडवला आणि दिल्लीचा डाव १६.३ षटकांत ७५ धावांत गुंडाळला. हेझलवूडने ४, भुवनेश्वरने ३, तर कृणाल, सूयश व रसिक यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूने आक्रमक सुरुवात केली. जेकब बेथल व विराट कोहली यांनी ३ षटकांतच २६ धावा केल्या. जेमिसनने बेथलचा २० धावांवर अडसर दूर केला. मात्र तिसऱ्या क्रमांकावरील देवदत्त पडिक्कलने १३ चेंडूंत प्रत्येकी ३ चौकार-षटकारांसह नाबाद ३४ धावा फटकावून दिल्लीच्या आशा संपुष्टात आणल्या. विराटने १५ चेंडूंत नाबाद २३ धावा करून त्याला उत्तम साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची अभेद्य भागीदारी रचली. नटराजनला सलग दोन षटकार लगावून ६.३ षटकांत विराटने बंगळुरूच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. एकूणच या लढतीत बंगळुरूने पहिल्या चेंडूपासून वर्चस्व गाजवताना दिल्लीला त्यांच्याच मैदानात पूर्णपणे निष्प्रभ केले.

या विजयासह बंगळुरूने गुणतालिकेतील दुसरे स्थान आणखी भक्कम केले आहे. आठपैकी सहा विजयांच्या १२ गुणांसह हा संघ बाद फेरीच्या दिशेने कूच करत आहे. त्यांची धावगतीदेखील अन्य सर्व संघांच्या तुलनेत उत्तम आहे. बंगळुरूचा पुढील सामना गुरुवारी गुजरातविरुद्ध होईल. दुसरीकडे दिल्लीला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने ते सातव्या स्थानी आहेत. आठपैकी फक्त ३ सामने दिल्लीने जिंकले आहेत. त्यांची आता शुक्रवारी राजस्थानशी गाठ पडेल.

दिल्लीने पॉवरप्लेच्या सहा षटकांत फक्त १३ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही आजवरची पॉवरप्लेमधील सर्वात कमी धावसंख्या ठरली.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली कॅपिटल्स : १६.३ षटकांत सर्व बाद ७५ (अभिषेक पोरेल ३०, डेव्हिड मिलर १९; जोश हेझलवूड ४/१२, भुवनेश्वर कुमार ३/५) पराभूत वि.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : ६.३ षटकांत १ बाद ७७ (देवदत्त पडिक्कल नाबाद ३४, विराट कोहली नाबाद २३)

प्रशासनात फेरबदलाचे वारे! गृहनिर्माण, जलसंपदा विभागांना मिळणार नवे सचिव

मुंबई महापालिकेच्या 'त्या' विधी अधिकाऱ्यांना दिलासा; नियुक्तीच्या तारखेपासून ‘नियमित कर्मचारी’ मानण्याचा HC चा आदेश

Mumbai : वाढदिवसाच्या मेजवानीत एसी बंद; ग्राहक आयोगाचा रेस्टॉरंटला दंड

भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक व्यापार करार; भारतीय वस्तूंना न्यूझीलंडमध्ये विनाशुल्क प्रवेश, १५ वर्षांत २० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

Mumbai : बलात्कारप्रकरणी पालिका सहाय्यक आयुक्ताला अटक; लग्न झाल्याची बाब पीडितेपासून लपवली