अहमदाबाद/बंगळुरू : अखेर १७ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आला आणि विराट कोहलीसह तमाम बंगळुरूच्या चाहत्यांची स्वप्नपूर्ती झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवारी रात्री रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १८व्या हंगामाचे जेतेपद काबिज केले. या ऐतिहासिक जेतेपदानंतर बुधवारी बंगळुरूच्या सर्व खेळाडूंचे विधानसभा आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर उत्साहात आणि चाहत्यांच्या तुडुंब गर्दीत स्वागत करण्यात आले. मात्र या उत्साहाला काही चाहत्यांचा मृत्यू झाल्याने गालबोटही लागले.
रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने यंदा संपूर्ण हंगामात जेतेपदाच्या प्रबळ दावेदारासारखा खेळ केला. त्यांनी संपूर्ण हंगामात प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात एकही लढत गमावली नाही. त्याशिवाय अनेकदा सामन्यात पिछाडीवर असतानाही दडपणाखाली कामगिरी उंचावून संघाला मार्ग दाखवला. आयपीएलला २००८पासून प्रारंभ झाला. तेव्हापासून ३ वेळा बंगळुरूने अंतिम फेरी गाठली होती. मात्र २००९, २०११ व २०१६ अशा तिन्ही वेळेस त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
यंदा मात्र ९ वर्षांनी त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. या हंगामात बंगळुरूने मुंबईला वानखेडेवर, चेन्नईला चेपॉकवर, तर कोलकाताला ईडन गार्डन्सवर नमवण्याचा पराक्रम केला. तसेच एकंदर स्पर्धेत त्यांनी ११ सामने जिंकले. अंतिम सामन्यात १९० धावा विजयासाठी पुरेशा नसतील, असे एकवेळ वाटले. मात्र बंगळुरूच्या गोलंदाजांनी पंजाबला संघर्ष करण्यास भाग पाडले. अखेरीस फक्त ६ धावांच्या फरकांनी त्यांनी विजेतेपद पटकावले. त्यावेळी विराटला अश्रू अनावर झाले. भारतातील तमाम चाहतेही यावेळी विराटच्या आनंदात सामील झाले. पत्नी अनुष्का, खास मित्र एबी डीव्हिलियर्स यांच्यासह विराट जल्लोष करताना दिसला. बंगळुरूच्या चाहत्यांविषयी जगभरात काहीही म्हटले जात असले, तरी विराट या चषकाचा हकदार होता, हे सत्य नाकारू शकत नाही. आयपीएल जिंकून विराटने प्रत्येक महत्त्वाच्या स्पर्धेचे जेतेपद काबिज करून दाखवले.
बंगळुरू माझे सर्वस्व : विराट
कोहली हा आयपीएलच्या १८ हंगामात एकाच संघाकडून खेळणारा एकमेव खेळाडू आहे. मंगळवारी अहमदाबादमध्ये पंजाब किंग्जविरुद्धच्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात बंगळुरूने सहा धावांनी विजय मिळवला तेव्हा तो गुडघे टेकून, मैदानावर डोके टेकवून आणि अश्रू ढाळताना दिसला . आरसीबीचे त्याचे सहकारी, त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि त्याचे माजी सहकारी एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांच्यासोबत आणखी बरेच भावनिक क्षण होते.
“हा विजय जितका चाहत्यांसाठी आहे तितकाच तो संघासाठी आहे. १८ वर्षे झाली आहेत. मी या संघाला माझे तारुण्य, माझे श्रेष्ठत्व आणि माझा अनुभव दिला आहे. मी प्रत्येक हंगामात येताना हे जिंकण्याचा प्रयत्न केला आहे, माझ्याकडे असलेले सर्व काही दिले आहे. हा क्षण अनुभवणे ही एक अविश्वसनीय भावना आहे,” असे विराट म्हणाला.
“मी कधीच विचार केला नव्हता की हा दिवस येईल. शेवटचा चेंडू टाकताच मी भावुक झालो. हे माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे. मी माझी प्रत्येक ऊर्जा या संघाला दिली आहे. अखेर आयपीएल जिंकणे ही एक अद्भुत भावना आहे. माझ्याकडे असे काही क्षण आले आहेत जेव्हा मी वेगळे विचार करत असे, पण मी या संघाशी चिकटून राहिलो. मी त्यांच्या मागे उभा राहिलो, ते माझ्या मागे उभे राहिले. मी नेहमीच त्यांच्यासोबत जिंकण्याचे स्वप्न पाहिले आहे,” असेही विराटने सांगितले.