क्रीडा

रिदम-उज्ज्वलचा सुवर्ण निशाणा; पहिल्याच दिवशी भारताला एकूण तीन पदके

Swapnil S

कैरो : भारताच्या रिदम सांगवान आणि उज्ज्वल मलिक यांनी आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकावर निशाणा साधला. कैरो येथे शनिवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताने पहिल्याच दिवशी एकंदर तीन पदकांची कमाई केली. भारताच्या खात्यात १ सुवर्ण व २ रौप्यपदके जमा आहेत.

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या हरयाणाच्या रिदम व उज्ज्वल यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील मिश्र सांघिक विभागात एल्मिरा केप्टन आणि बेनिक खलगीस्तान या अर्मेनियाच्या जोडीवर ११-७ असा विजय मिळवला. रिदमचे हे विश्वचषकातील सलग दुसरे सुवर्ण ठरले. पात्रता फेरीत या दोघांनी दुसरे स्थान मिळवले होते. मात्र अंतिम फेरीत त्यांनी बाजी मारली.

त्यानंतर अर्जुन बबुता आणि सोनम मस्कर यांनी १० मीटर एअर रायफल प्रकारातील मिश्र सांघिक विभागात रौप्यपदक प्राप्त केले. ब्रिटनच्या डीन बेले आणि सीनोईड यांनी त्यांच्यावर टायब्रेकरमध्ये सरशी साधली. ट्रॅप प्रकारात भारताच्या नेमबाजांना पदक जिंकण्यात अपयश आले. झोरावर संधू पुरुषांमध्ये १२व्या स्थानी राहिला. तर भौनीश व पृथ्वीराज यांना त्यापेक्षाही खालच्या स्थानी समाधान मानावे लागले.

३३ वर्षीय अनुराधा देवीने मात्र पदार्पणातच महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल एकेरी प्रकारात रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली. महिलांच्या ट्रॅप प्रकारात राजेश्वरी कुमारी व मनीषा कीर यांना अनुक्रमे १५ वे १८वे स्थान मिळाले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल