गुवाहाटी : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम आता हळूहळू रंगू लागला आहे. त्याच टप्प्यावर शुक्रवारी गुवाहाटीच्या बारसापरा स्टेडियमवर दोन अपराजित संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. एकीकडे घरच्या मैदानात खेळताना राजस्थान रॉयल्स संघ विजयाचा चौकार लगावण्यासाठी आतुर आहे, तर गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विजयी हॅटट्रिक साकारण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. दोन्ही संघांतील आघाडीच्या फलंदाजांमधील जुगलबंदीकडे सर्वांचे लक्ष असेल.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील.
रियान परागच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानने सलग तीन विजयांसह तूर्तास गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले आहे. त्यांनी अनुक्रमे चेन्नई, गुजरात व मुंबई या संघांना नमवले. विशेषत: गुवाहाटी येथे चेन्नई व मुंबई यांच्यावर त्यांनी सहज मात केली. आता शुक्रवारी पुन्हा एकदा घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना राजस्थानचे पारडे जड असेल. २००८मध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थानला गतवर्षी बाद फेरी गाठता आली नव्हती. तसेच २-३ सामन्यांत ते अखेरच्या षटकात पराभूत झाले. यंदा मात्र हा संघ धडाकेबाज सलामी आणि परिपूर्ण गोलंदाजीच्या बळावर वर्चस्व गाजवत आहे. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी, युवा यशस्वी जैस्वाल या डावखुऱ्या फलंदाजांची जोडी राजस्थानसाठी कमाल करत आहे. दोघांनीही गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली आहे. गोलंदाजीत नांद्रे बर्गर, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा व तुषार देशपांडे यांची वेगवान चौकडी, तर पर्पल कॅपच्या शर्यतीत अग्रस्थानी असलेला रवी बिश्नोई यांच्यामुळे राजस्थान घातक ठरत आहे.
दुसरीकडे, रजत पाटीदारच्या नेतृत्वात गतविजेत्या बंगळुरूनेदेखील थाटात सुरुवात केली आहे. त्यांनी अनुक्रमे हैदराबाद व चेन्नई संघाला धूळ चारली. घरच्या मैदानात दोन सामने खेळल्यावर आता बंगळुरू यंदाच्या हंगामात प्रथमच प्रतिस्पर्ध्याच्या मैदानात खेळणार आहे. गतवर्षी त्यांनी प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानातील सर्व सामने जिंकले होते. त्यामुळे यंदाही त्यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. विराट कोहली, फिल सॉल्ट, टिम डेव्हिड असे एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. गोलंदाजीत जोश हेझलवूडच्या अनुपस्थितीत आतापर्यंत भुवनेश्वर कुमार, जेकब डफी यांनी आपली कामगिरी चोख बजावलेली आहे. फिरकीपटू सूयश शर्मा, कृणाल पंड्या मधल्या षटकांत छाप पाडत आहे. त्यामुळे बंगळुरूला रोखणे राजस्थानसाठी इतके सोपे नसेल.
दरम्यान, राजस्थानच्या संदीपने विराटला १८ पैकी ७ डावांत बाद केले आहे. त्यामुळे त्या दोघांमधील जुगलबंदी पाहण्याजोगी असेल. त्याशिवाय यशस्वी-वैभव यांची जोडी अद्याप पॉवरप्लेमध्ये अद्याप बाद झालेली नाही. त्यांनी ३ सामन्यांत अनुक्रमे ७४, ६९, ५९ अशा धावा चोपल्या आहेत. त्यामुळे या दोघांना बंगळुरूचे गोलंदाज कसे रोखणार, यावरच सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल.
उभय संघांत आतापर्यंत ३४ सामने झाले आहेत. त्यांपैकी बंगळुरूने १७, तर राजस्थानने १४ लढती जिंकल्या आहेत. तीन सामने रद्द करण्यात आले आहेत. आकडेवारीनुसार दोन्ही संघांत फारसा फरक नसल्याने लढतही रंगतदार होईल.
खेळपट्टीचा अंदाज
गुवाहाटी येथे शुक्रवारी पावसाची शक्यता नाही. त्यामुळे चौकार-षटकारांची उधळण पाहायला मिळू शकते. मुंबईविरुद्ध ज्या खेळपट्टीवर लढत झाली, तेथेच शुक्रवारचा सामना होणार आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीदेखील स्वीकारू शकतो.
प्रतिस्पर्धी संघ
राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), शुभम दुबे, यशस्वी जैस्वाल, लुहान प्रिटोरियस, वैभव सूर्यवंशी, अमन राव, शिम्रॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवी सिंग, दोनोवन फरेरा, दसुन शनका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, ॲडम मिल्ने, सुशांत मिश्रा, विघ्नेश पुथूर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, कुलदीप सेन, यश पुनिया, युधवीर सिंग.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), जॉर्डन कॉक्स, विराट कोहली, टिम डेव्हिड, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जेकब बेथल, कनिष्क चौहान, वेंकटेश अय्यर, विहान मल्होत्रा, मंगेश यादव, कृणाल पंड्या, रोमारिओ शेफर्ड, अभिनंदन सिंग, सात्विक देस्वाल, जेकब डफी, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, विकी ओस्तवाल, रसिक सलाम, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, नुवान थुशारा, यश दयाल.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप