क्रीडा

रॉसोचा रुद्रावतार; दक्षिण आफ्रिकेकडून बांगलादेशचा १०४ धावांनी धुव्वा उडवला

वृत्तसंस्था

डावखुरा फलंदाज रायली रॉसोने (५६ चेंडूंत १०९ धावा) साकारलेल्या धडाकेबाज शतकाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशचा १०४ धावांनी धुव्वा उडवला. याबरोबरच आफ्रिकेने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

टेम्बा बव्हूमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघाने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या दुसऱ्या गटातील या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २०५ धावांचा डोंगर उभारला. बव्हूमा (२) स्वस्तात माघारी परतल्यानंतर क्विंटन डीकॉक (३८ चेंडूंत ६३) आणि रॉसो यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६८ धावांची भागीदारी रचली. अनुभवी डीकॉकने दमदार अर्धशतक साकारताना सात चौकार, तीन षटकार लगावले. तर रॉसोने सात चौकार, आठ षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळे आफ्रिकेने दोनशे धावांचा टप्पा गाठला.

लक्ष्याचा पाठलाग करताना आनरिख नॉर्किएच्या भेदक गोलंदाजीपुढे बांगलादेशचा डाव अवघ्या १६.३ षटकांत १०१ धावांत संपुष्टात आला. नॉर्किएने १० धावांत चार बळी पटकावले, तर तबरेझ शम्सीने २० धावांत तीन बळी मिळवून त्याला उत्तम साथ दिली. बांगलादेशकडून फक्त लिटन दासने (३४) एकाकी झुंज दिली. झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीत पावसाने खेळखंडोबा केल्यामुळे आफ्रिकेला एका गुणावर समाधान मानावे लागले. मात्र बांगलादेशला धूळ चारून त्यांनी रविवारी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी सर्वांना इशारा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापूर आणि पुण्यात सभा; 'हे' रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

महाराष्ट्रातील राजकारण भरकटत आहे!

नद्या आ वासताहेत...

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."