Photo : X (@ZimCricketv)
क्रीडा

SA VS ZIM : मल्डर नाबाद ३६७; मात्र लाराचा विक्रम मोडण्याची संधी गमावली! ५ बाद ६२६ धावांवर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव घोषित

कर्णधार वियान मल्डरला सोमवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवण्याची संधी होती. मात्र ३६७ धावांवर नाबाद असताना मल्डरनेच संघाचा डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ब्रायन लाराचा कसोटीतील ४०० धावांचा विक्रम मोडण्याची संधी मल्डरने गमावली.

Swapnil S

बुलावायो : कर्णधार वियान मल्डरला सोमवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवण्याची संधी होती. मात्र ३६७ धावांवर नाबाद असताना मल्डरनेच संघाचा डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ब्रायन लाराचा कसोटीतील ४०० धावांचा विक्रम मोडण्याची संधी मल्डरने गमावली.

दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात बुलावायो येथे दुसरी कसोटी सुरू आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात आफ्रिकेने ११४ षटकांत ५ बाद ६२६ धावांवर पहिला डाव घोषित केला. मल्डरने ३३४ चेंडूंत ४९ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ३६७ धावा फटकावल्या. कसोटी क्रिकेटमधील ही पाचव्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. लाराने २००४मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद ४०० धावा केल्या होत्या.

त्यानंतर मॅथ्यू हेडन (३८० वि. झिम्बाब्वे, २००३), लारा (३७५ वि. इंग्लंड, १९९४) आणि महेला जयवर्धने (३७४ वि. दक्षिण आफ्रिका, २००६) यांचा क्रमांक लागतो. मल्डरने पाचवे स्थान मिळवताना गॅरी सोबर्स (नाबाद ३६५) यांना पिछाडीवर टाकले. २७ वर्षीय मल्डरला ४०० धावा करण्याची उत्तम संधी होती. मात्र उपहारानंतर आफ्रिकेने डाव घोषित केला. स्वत: मल्डरच संघाचा कर्णधार असल्याने अनेकांना त्याने हा निर्णय का घेतला, हे समजले नाही. तर काहींनी त्याच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक करतानाच अन्य खेळाडूंनी याद्वारे बोध घ्यावा, असेही सुचवले.

या सामन्यात मल्डरने कसोटी क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान त्रिशतक झळकावले. वीरेंद्र सेहवागने २००८मध्ये आफ्रिकेविरुद्ध २७८ चेंडूंत शतक साकारले होते, तर मल्डरने २९७ चेंडूंत ही कामगिरी केली. तसेच मल्डर हा आफ्रिकेसाठी कसोटीत त्रिशतक झळकावणारा दुसराच फलंदाज ठरला. यापूर्वी हाशिम अमलाने अशी कामगिरी केली होती.

आफ्रिकेच्या पहिल्या डावातील प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ पहिल्या डावात १७० धावांत गारद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात झिम्बाब्वेने दुसऱ्या दिवसअखेर १ बाद ५१ धावा केल्या असून ते अद्याप ४०५ धावांनी पिछाडीवर आहेत. मल्डरने पहिल्या डावात २ बळीसुद्धा मिळवत अष्टपैलू योगदान दिले.

टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वात आफ्रिकेने काही आठवड्यांपूर्वी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. मात्र बव्हुमाला दुखापतीमुळे या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. दोन लढतींच्या या मालिकेत आफ्रिकेचा संघ १-० असा आघाडीवर आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग नाही. त्यामुळे आफ्रिकेने दुसऱ्या फळीतील खेळाडूंना संधी दिली आहे.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी