मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनने एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयात भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना समर्पित असलेल्या ‘बॅटोग्राफी’ या अनोख्या दालनाचे अनावरण केले. १९७८ ते २०१३ या कालावधीतील सचिनच्या असामान्य क्रिकेट प्रवासाचा मागोवा घेणाऱ्या २५ बॅट्स, तसेच त्यांच्या वैयक्तिक संग्रहातील निवडक हेडगियर आणि पोशाख यांचा या दालनात समावेश आहे.
सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सोमवारी एका विशेष कार्यक्रमात या दालनाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक उपस्थित होते. वेस्ट इंडिजविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तेंडुलकरच्या २००व्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला (१६ नोव्हेंबर २०१३) १३ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्यही साधले गेले.
एखाद्या क्रिकेटपटूची कहाणी त्याच्या खेळाशी सर्वाधिक जवळून जोडलेल्या साधनाच्या माध्यमातून सांगण्याच्या संकल्पनेतून ‘बॅटोग्राफी’ साकारण्यात आले आहे. या दालनातील प्रत्येक बॅट ही सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील आणि कारकिर्दीतील एका महत्त्वपूर्ण पर्वाचे प्रतिनिधित्व करते. या संग्रहाची सुरुवात १९७८ मध्ये, वयाच्या पाचव्या वर्षी त्यांची मोठी बहीण सविता यांनी भेट दिलेल्या काश्मीर विलोच्या बॅटपासून होते, तर वानखेडेवर खेळलेल्या त्यांच्या अखेरच्या कसोटी डावात वापरलेल्या बॅटने या प्रवासाची सांगता होते. या संग्रहातील काही अत्यंत महत्त्वाच्या बॅट्समध्ये १९९० मध्ये वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी मँचेस्टर येथे पहिले कसोटी शतक झळकावण्यासाठी वापरलेली बॅट; १९९८ मध्ये सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी भेट दिलेली बॅट; २००३ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वापरलेली आणि ज्या कामगिरीसाठी त्यांना मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले ती बॅट; तसेच १६ मार्च २०१२ रोजी मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १००वे शतक झळकावण्यासाठी वापरलेल्या बॅटचा समावेश आहे.
सचिन म्हणाला की, “२४ वर्षे माझे आयुष्य २२ यार्डच्या खेळपट्टीभोवती फिरत होते आणि या संपूर्ण प्रवासात माझ्या बॅट्स कायम माझ्यासोबत होत्या.”
स्मृतिचिन्हांची जोड
बॅट्सच्या या संग्रहाला तेंडुलकर यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण क्षणांची आठवण करून देणाऱ्या विविध स्मृतिचिन्हांची जोड देण्यात आली आहे. यामध्ये त्यांचे पहिले हेल्मेट, मुंबई रणजी करंडक संघाची जर्सी, त्यांच्या २००व्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाची जर्सी आणि हेल्मेट, तसेच वानखेडेवर झालेल्या निरोपाच्या भाषणादरम्यान त्यांनी संदर्भासाठी वापरलेले कागदी पान यांचा समावेश आहे.