मुंबई : संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा या भारताच्या दोन अनुभवी खेळाडूंची पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) एकमेकांच्या संघात अदलाबदल झालेली पाहायला मिळू शकते.
एका लोकप्रिय इंग्रजी संकेतस्थळाच्या वृत्तानुसार ३१ वर्षीय सॅमसन राजस्थान रॉयल्सला सोडून चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्यास राजी असल्याचे समजते. त्या बदल्यात चेन्नईचा संघ राजस्थानला ३६ वर्षीय अष्टपैलू जडेजासह इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करनदेखील देण्यास तयार आहे. पुढील महिन्यात आयपीएलसाठी खेळाडूंचे ऑक्शन होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना खेळाडूंची आपापसात अदलाबदल करण्यासह संघात कायम राखण्यात आलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्याची मुदत आहे. त्यामुळे चेन्नई व राजस्थान यांच्यात हा करार झाल्याचे समजते.
सॅमसन हा २०१३पासून आयपीएलमध्ये खेळत असून गेल्या काही वर्षांपासून तो राजस्थानचे कर्णधारपदही भूषवत आहे. २०२२मध्ये सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र २०२५मध्ये राजस्थान साखळीतच गारद झाला. तसेच सॅमसनची कामगिरीही संमिश्र स्वरूपाची राहिली. अशा स्थितीत सॅमसनने स्वत: संघाला आपल्याला मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली असल्याचे समजते. गतवर्षी सॅमसनला १८ कोटी किमतीत राजस्थानने संघात कायम राखले होते. सॅमसनच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वाल किंवा रियान पराग राजस्थानचा कर्णधार होऊ शकतो.
त्याच वेळी दुसरीकडे चेन्नईचा संघही गेल्या दोन हंगामांपासून संघर्ष करत आहे. ऋतुराज गायकवाड कर्णधार असला तरी दुखापतीमुळे त्याच्या अनुपस्थितीत महेंद्रसिंह धोनीलाच नेतृत्व सांभाळावे लागले. धोनीचे वाढते वय पाहता चेन्नईला एका भारतीय यष्टिरक्षक फलंदाजाची नक्कीच गरज आहे. तसेच ते सॅमसनला संघात आणून कर्णधारपदही देऊ शकतात. मात्र सॅमसनला संघात आणण्यासाठी त्यांना १८ कोटी रुपये मोजावे लागतील. त्यामुळे त्या बदल्यात ते तेवढ्याच किमतीच्या जडेजाला राजस्थानकडे देणार असल्याचे समजते.
जडेजाने २०२१ व २०२३च्या आयपीएलमध्ये चेन्नईला जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. २०१२पासून तो चेन्नईचा भाग आहे. मात्र आंतरराष्ट्रीय टी-२० प्रकारातून जडेजा निवृत्त झाला आहे. जडेजाकडे २५४ आयपीएल सामन्यांचा अनुभव असून त्याने चेन्नईसाठी सर्वाधिक १४३ बळी मिळवले आहेत. गेल्या वर्षी जडेजाने फलंदाजीतही काहीशी चमक दाखवली. मात्र चेन्नई आता प्रामुख्याने युवा खेळाडूंभोवती संघ बांधत असल्याचे दिसून येते. २००८ मध्ये जडेजाने राजस्थानकडूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. अशा स्थितीत हा करार झाल्यास जडेजा पुन्हा राजस्थानकडे परतेल.
दुसरीकडे इंग्लंडचा सॅम करन हा वेगवान गोलंदाजीसह उपयुक्त फटकेबाजी करू शकतो. त्याला २.४ कोटी रुपयांत चेन्नईने विकत घेतले होते. मात्र २०२५मध्ये त्याला फारशी छाप पाडता आली नाही. चेन्नईचा संघही गुणतालिकेत तळाशी राहिला. त्यामुळे आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, मथीशा पाथिराना यांसारख्या युवा खेळाडूंभोवती आता चेन्नई संघबांधणी करताना दिसत आहे.
एकंदर, गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या या अदलाबदलीविषयी सगळीकडे चर्चा सुरू असून आता १५ तारखेपर्यंत सर्व संघांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
१५ नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना मुभा
आयपीएलच्या लिलावापूर्वी सर्व संघांना १५ नोव्हेंबरपर्यंत आपल्याकडे कायम राखलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. यंदा फक्त मिनी ऑक्शन असल्याने सर्व संघ कितीही खेळाडू आपल्याकडे कायम राखू शकतात. ते जितके खेळाडू सोडतील, तितकी रक्कम त्यांच्याकडे लिलावासाठी जमा होईल. त्यामुळे गतवर्षी गुणतालिकेत तळाशी राहिलेले संघ अधिकाधिक खेळाडूंना लिलावात उतरवून नव्या खेळाडूंना विकत घेण्यासाठी उत्सुक असतील.