बिलासपूर : सर्फराझ खानने २१३ चेंडूंत नाबाद १३९ धावांची शानदार शतकी खेळी साकारली. त्यामुळे रणजी करंडक स्पर्धेत ड-गटातील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी मुंबईने हिमाचल प्रदेशच्या पहिल्या डावातील १४० धावांच्या उत्तरादाखल ४ बाद ३९८ धावांपर्यंत मजल मारली.
दिवस संपला तेव्हा सर्फराझ २१३ चेंडूंत १८ चौकारांच्या मदतीने नाबाद होता, तर आकाश आनंद १५२ चेंडूंत ५८ धावा करून त्याच्यासह खेळपट्टीवर टिकून होता. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद १७६ धावांची भागीदारी केली. यासह मुंबईने पहिल्या डावात २५८ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.
तत्पूर्वी, कर्णधार सिद्धेश लाड आदल्या दिवशीच्या १२ धावांवरून पुढे खेळताना ८७ धावा काढून बाद झाला. त्याने १८८ चेंडूंत १४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ही खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुशीर खाननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. आदल्या दिवशीच्या ३४ धावांपासून पुढे खेळताना तो ५७ धावा काढून बाद झाला. रविवारी तुषार देशपांडेने ४६ धावांत चार बळी घेत हिमाचल प्रदेशचा डाव ३९.५ षटकांत १४० धावांवर गारद केला होता.