ग्लासगो : महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या सर्वेश कुशारेने सोमवारी मध्यरात्री ऐतिहासिक कामगिरी नोंदवताना गगनभरारी घेतली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समधील पुरुषांच्या उंच उडी प्रकारात नाशिकच्या सर्वेशने रौप्यपदकाला गवसणी घातली. भारतासाठी राष्ट्रकुलमध्ये उंच उडीत रौप्यपदक जिंकणारा तो पहिलाच क्रीडापटू ठरला. सर्वेशच्याच कामगिरीची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
अतिशय रोमहर्षक झालेल्या या स्पर्धेत जमैकाचा रोमेन बेकफोर्ड आणि सर्वेश या दोघांनीही २.२५ मीटर उंच उडी घेतली. त्यानंतर २.२८ मीटरचा टप्पा दोघांनाही ओलांडता आला नाही. मात्र, कमी अपयशी प्रयत्नांच्या आधारे बेकफोर्डला सुवर्णपदक जाहीर झाले, तर सर्वेशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. इंग्लंडच्या जॅक किमानीने २.२० मीटरसह कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत सहभागी झालेला अन्य भारतीय खेळाडू आदर्श राम २.१५ मीटर कामगिरीसह पाचव्या स्थानावर राहिला.
ग्लासगो येथे राष्ट्रकुलचे २३वे पर्व रंगत असून या स्पर्धेत क्रीडा प्रकारांची संख्या कमालीची घटवण्यात आली आहे. यावेळी फक्त १० खेळांचा स्पर्धेत समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले आहेत, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, माऊंटेन बायकिंग, रग्बी, स्क्वॉश, टेबल टेनिस, कुस्ती, ट्रायथलॉन यांसारखे खेळ यंदा राष्ट्रकुलचा भाग नाहीत. भारताचे १२६ खेळाडू यावेळी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांतच भारताला पदकांची सर्वाधिक अपेक्षा आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील देवगाव येथील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या सर्वेशने लहानपणी शेतातील मक्याचे धाट, कापूस व कृषी कचऱ्यापासून बनवलेल्या तात्पुरत्या मॅटवर सराव केला होता. सर्वेशची राष्ट्रकुल स्पर्धेतील ही पहिलीच वेळ आणि पहिलेच पदक आहे. यापूर्वी २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विन शंकरने कांस्यपदक जिंकले होते. या स्पर्धेत तेजस्विन शंकरनेही सहभाग घेतला होता, परंतु गुरुवारी होणाऱ्या डेकॅथलॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून त्याने २.०५ मीटरच्या पहिल्या प्रयत्नानंतर माघार घेतली. त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे समजते.
"हे माझे पहिलेच पदक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या स्पर्धेत हे यश मिळवणे अभिमानास्पद आहे," असे सर्वेश म्हणाला. आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धा ऑलिम्पिकचा मार्ग सुकर करतात, त्यामुळे आशियाई स्पर्धेत आता सुवर्णपदक जिंकण्याचे माझे ध्येय असल्याचे त्याने नमूद केले. या महिन्याच्या सुरुवातीला डायमंड लीग स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय उंच उडीपटू ठरण्याचा पराक्रमही त्याने केला होता.
भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत २.३१ मीटर उंच उडी मारून त्याने राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. सर्वेशने २०१४च्या कनिष्ठ स्पर्धेतून राष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वेश कुशारेचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वेशने मिळवलेले रौप्यपदक नेत्रदीपक असून त्याची जिद्द आणि सातत्य कौतुकास्पद आहे, भारताला त्याचा अभिमान आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नाशिक जिल्ह्यातील देवगाव येथील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या सर्वेशने लहानपणी शेतातील मक्याचे घाट, कापूस व कृषी कचऱ्यापासून बनवलेल्या तात्पुरत्या मॅटवर सराव केला होता. सर्वेशची राष्ट्रकुल स्पर्धेतील ही पहिलीच वेळ आणि पहिलेच पदक आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला डायमंड लीग स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय उंच उडीपटू ठरण्याचा पराक्रमही त्याने केला. भुवनेश्वरला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत २.३१ मीटर उंच उडी मारून त्याने राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.
तेजस्विनला दुखापत; मात्र मार्गदर्शन मोलाचे
स्वतः दुखापतग्रस्त झाल्यानंतरही तेजस्विन शंकरने सहकारी खेळाडू सर्वेशला दिलेला तांत्रिक सल्ला भारताला रौप्यपदक मिळवून देण्यात निर्णायक ठरला आहे. सराव करताना गुडघ्याची जुनी दुखापत उफाळून आल्याने २७ वर्षीय तेजस्विनला पहिल्याच प्रयत्नानंतर स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. स्वतःच्या अपयशाचे दुःख बाजूला ठेवून तो मैदानावरच थांबला आणि त्याने सर्वेशला मार्गदर्शन केले.
स्पर्धेत २.२५ मीटर उंची पार करताना सर्वेशची लय बिघडली होती आणि त्याची पावले कमी पडत होती. अशा वेळी तेजस्विनने त्याला धावण्याच्या लयीत पुढे सरकण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे त्याला ही उंची पार करता आली आणि रौप्यपदक पक्के झाले. "सरावादरम्यान त्याच्या गुडघ्याला तीव्र वेदना सुरू झाल्या. उंच उडी मारणाऱ्या बहुतांश खेळाडूंना पटेलार टेडोनिटिसचा त्रास असतो आणि हा आजार त्याच्यासाठी नवीन नाही," असे तेजस्विन म्हणाला. गुरुवारी डेकॅथलॉन या प्रकारात पुनरागमन करण्याचा त्याला विश्वास आहे.