क्रीडा

शफाली वर्माला डच्चू; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा

भारताची सलामीवीर शफाली वर्मा हिला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघातून डच्चू देण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुमार कामगिरी करणाऱ्या शफालीला आता संघातील स्थान गमवावे लागले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताची सलामीवीर शफाली वर्मा हिला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघातून डच्चू देण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुमार कामगिरी करणाऱ्या शफालीला आता संघातील स्थान गमवावे लागले आहे.

शफालीची वनडेमधील कामगिरी खूपच घसरली आहे, त्यामुळे बीसीसीआयच्या निवड समितीचे सदस्य तिच्यावर नाखूश होते. २० वर्षीय शफालीने गेल्या सहा सामन्यांत फक्त १०८ धावा केल्या आहेत, त्यातही ३३ ही तिची सर्वोत्तम खेळी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतही तिला डावलण्यात आले होते. मात्र त्यानंतर तिने जून महिन्यात बंगळुरू येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघात पुनरागमन केले होते.

२०२१मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर शफालीकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात होते. मात्र २०२२मध्ये श्रीलंकेविरुद्ध केलेली नाबाद ७१ धावांची खेळी वगळता तिला त्यानंतर एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही.

उमा छेत्री, दयालन हेमलता, श्रेयांका पाटील आणि सायली सातघरे यांनाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले आहे. गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला होता. त्यात या खेळाडूंनी छाप पाडली होती. हरलिन देओल, रिचा घोष, मिन्नू मणी, टिटास सिधू आणि प्रिया पुनिया या खेळाडूंची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिले दोन वनडे सामने वाका ग्राऊंडवर ५ आणि ८ डिसेंबर रोजी होतील. आणि तिसरा एकदिवसीय सामना पर्थ येथे ११ डिसेंबर रोजी खेळवण्यात येईल.

भारतीय संघ

भारतीय महिला क्रिकेट संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, प्रिया पुनिया, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलिन देओल, यास्तिका भाटिया, रिचा घोष, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, टिटास सिधू, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, सायमा ठाकोर.

राज्यात ६० टक्के मतदान; सर्वाधिक ६९.२२ टक्के मतदान गडचिरोलीत

सिंहासनासाठी काँटे की टक्कर! ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांमध्ये संमिश्र कौल

सुसंस्कृत महाराष्ट्रातही मतदानादरम्यान हिंसक घटना

चार राज्यांतील पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

मुंबईत मतदारांमध्ये निरूत्साह! केवळ ५१.४१ टक्के मतदान; अनेक मतदारांची मतदानाकडे पाठ