क्रीडा

अविनाश साबळेसह ४७ खेळाडूंना 'शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार' जाहीर; राज्य सरकारची घोषणा, बघा लिस्ट

२०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ३ हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून अविनाशने इतिहास घडवला होता. पदक जिंकता आले नसले तरी...

Swapnil S

मुंबई : भारताचा ऑलिम्पियन धावपटू अविनाश साबळे याला २०२२-२३ सालचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य सरकारने गुरुवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ३ हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून अविनाशने इतिहास घडवला होता. पदक जिंकता आले नसले तरी अविनाशने नवा राष्ट्रीय विक्रम केला होता. २०२२-२३चा जीवनगौरव पुरस्कार दिग्गज बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना जाहीर झाला आहे. तर भारताचा कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचे मार्गदर्शक दिनेश लाड यांना तसेच कबड्डीपटू अनिल घाटे यांना जिजामाता पुरस्कार जाहीर झाला आहे.

बीड ते ऑलिम्पिक असा प्रवास करणाऱ्या अविनाश साबळे याच्यासह अन्य ४७ जणांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाईल. १९८२ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रदीप गंधे यांनी मिश्र दुहेरीत आणि पुरुष सांघिक गटात कांस्यपदकाची कमाई केली होती. राज्य सरकारने गुरुवारी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाला देण्यात येणारे जिजामाता पुरस्कार जाहीर केले. हा पुरस्कार पवन भोईर (जिम्नॅस्टिक्स), अनिल घाटे (कबड्डी), राजाराम घाग (दिव्यांग खेळांचे मार्गदर्शक ॲक्वेटिक्स), दिनेश लाड (क्रिकेट), शुभांगी रोकडे (धनुर्विद्या), सुमा शिरूर (पॅराशूटिंग) यांना जाहीर झाले आहेत.

धावपटू अविनाश साबळे १२वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्यदलात दाखल झाला. लष्करासाठी अविनाशने सियाचीनच्या बर्फाळ हिमनदीपासून ते राजस्थानच्या वालुकामय भागापर्यंत देशाची सेवा केली. आर्मीमध्ये असताना २०१५ मध्ये त्याने ॲॅथलीट होण्याचा निर्णय घेतला. १३ सप्टेंबर १९९४ रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावात जन्मलेला हा तरुण आता देशाची शान बनला आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या अविनाशला लहानपणी शाळेत जाण्यासाठी ६ किलोमीटर चालत जावे लागे, त्यामुळे तो धावतच जायचा आणि तेथूनच त्याच्यात धावण्याची आवड कायम राहिली. २०१७ मध्ये आर्मीचे प्रशिक्षक अमरीश कुमार यांनी अविनाशला स्टीपल चेसमध्ये धावण्यास सांगितले आणि त्यानंतर अविनाशने मागे वळून पाहिले नाही.

राज्य क्रीडा पुरस्कारांचे मानकरी

-जीवन गौरव पुरस्कार - प्रदीप गंधे

-उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक - पवन भोईर (जिम्नॅस्टिक्स), शुभांगी रोकडे (धनुर्विद्या), अनिल घाटे (कबड्डी), राजाराम घाग (दिव्यांग खेळाचे क्रीडा मार्गदर्शक), दिनेश लाड (क्रिकेट), सुमा शिरूर (पॅराशूटिंग)

-शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार - अविनाश साबळे, दीप रामभीया, आदित्य मेहता, संदीप दिवे, अभिजीत त्रिपणकर, आदित्य मित्तल, प्रतिक पाटील, गिरीश काते, कुणाल कोठेकर, अक्षय तरळ, रुद्रांक्ष पाटील, शाहू माने, सुहृद सुर्वे, श्रेयस वैद्य, सर्वेश मेनन, सिद्धांत मोरे, रेनॉल्ड राफेल, निलम घोडके, शुशिकला आगाशे, कशीश भराड, जान्हवी जाधव, रुपाली गंगावणे, रुचिता विनेरकर, याश्वी शाह, दिया चितळे, श्रुती कडव, पूनम कैथवास, अक्षता ढेकळे, अपूर्वा पाटील, अंकिता जगताप, पंकज मोहिते, प्रियंका इंगळे, सुयश गरगटे, अक्षया शेडगे, धर्मेंद्रकुमार यादव, कोमल वाकळे, नंदिनी साळोखे, कल्याणी जोशी, विष्णू सर्वानन, वैष्णवी पाटील, श्रीधर निगडे, श्रेया नानकर, साहिल खान, नेहा देशमुख, जयेश मोरे, पूर्वा किनरे, नितीन पवळे.

-शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार - जयंत दुबळे, कस्तूरी सावेकर

-शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू ) - अफ्रीद अत्तार, निलेश गायकवाड, अन्नपूर्णा कांबळे, अनिता चव्हाण, लताताई उमरेकर, प्रियेषा देशमुख, नताशा जोशी, प्रांजली धुमाळ.

Satara : पोलीस उपनिरीक्षकाच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या; हातावर लिहिली सुसाइड नोट

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा

फडणवीस-जरांगे येणार एकाच व्यासपीठावर?

प्रेमभंग झाल्याने भररस्त्यात प्रेयसीवर चाकूहल्ला; प्रियकराची आत्महत्या; काळाचौकी येथील घटना

भारत बंदुकीच्या धाकावर व्यापार करार करत नाही; व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले