नवी दिल्ली : श्रेयस अय्यरसारख्या फलंदाजाला भारताच्या टी-२० संघात स्थान लाभत नाही. यावरून भारतीय संघ तसेच त्यांची फलंदाजी किती भक्कम आहे, हे स्पष्ट होते, असे मत न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू रॉस टेलरने व्यक्त केले.
३० वर्षीय श्रेयसला आगामी आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान न लाभल्याने सध्या त्याच्याविषयी चोहीकडे चर्चा सुरू आहे. श्रेयसवर अन्याय करण्यात येत आहे, असेही काहींचे म्हणणे आहे. याविषयी टेलरलाही विचारण्यात आले. एका ब्रँडच्या जाहिरातीनिमित्त सध्या टेलर नवी दिल्लीत आला आहे. “भारताचा आशिया चषकासाठी संपूर्ण संघ कसा आहे, हे मी अद्याप पाहिलेले नाही. मात्र श्रेयसला त्या संघात स्थान लाभले नाही, हे आश्चर्यजनक आहे. यावरूनच भारताची फलंदाजी किती मजबूत आहे, हेसुद्धा समजते. त्यामुळे मी त्यांचा खेळ पाहण्यासाठी आतुर आहे,” असे टेलर म्हणाला.