South Africa vs Australia : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; ऑस्ट्रेलियावर डावाने विजय (Photo-X)
क्रीडा

South Africa vs Australia : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; ऑस्ट्रेलियावर डावाने विजय

जवळपास १४५ षटके पाऊस आणि अंधूक सूर्यप्रकाशामुळे वाया जाऊनही टेम्बा बाव्हुमाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने अशक्यप्राय विजय नोंदवला.

Swapnil S

जोहान्सबर्ग : जवळपास १४५ षटके पाऊस आणि अंधूक सूर्यप्रकाशामुळे वाया जाऊनही टेम्बा बाव्हुमाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने अशक्यप्राय विजय नोंदवला. त्यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि ३१ धावांनी पराभव करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

सेंट जॉर्ज पार्कवर खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी दक्षिण आफ्रिकेने हा विजय मिळवला. पहिल्या सत्रातील पाऊस आणि वेगवान गोलंदाज नॉर्किए दुखापतीमुळे बाहेर पडलेला असतानाही दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली.

सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव ९९ धावांवर आटोपल्यानंतर त्यांना फॉलोऑन दिला गेला होता. पाचव्या दिवशी चार फलंदाजांच्या मोबदल्यात १५६ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने ट्रॅव्हिस हेड आणि स्कॉट बोलंड यांच्या जिगरबाज खेळाच्या बळावर संघर्ष केला. मात्र हेड १२१ धावांवर बाद झाला. त्याने १९० चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने आपले १३वे कसोटी शतक झळकावले.

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स, स्मिथ आणि इतर फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या माऱ्यापुढे टिकू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९५ धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने ४, तर वियान मल्डरने ३ गडी बाद केले. या विजयानंतर दोन्ही संघ आता मंगळवारपासून केपटाऊन येथे मालिकेतील निर्णायक सामना खेळणार आहेत.

मुख्य म्हणजे या कसोटीत एकवेळ प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेचा संघ ६ बाद ११० अशा संकटात होता. मात्र बाव्हुमाने १७९ धावांची शानदार खेळी साकारली. त्याला यान्सेन व हार्मरच्या अर्धशतकांची साथ लाभली. त्यामुळे आफ्रिकेने ९ बाद ४२५ धावांपर्यंत मजल मारली. बाव्हुमाच्या कर्णधार कारकीर्दीत आफ्रिकेने १४ पैकी १२ कसोटी जिंकल्या आहेत, हे विशेष.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

MLC Election 2026 : शिक्षक, ‘पदवीधर’साठी आज मतदान; मतदानासाठी यंत्रणा सज्ज; पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात

CJP चे आज देशव्यापी आंदोलन; दीपके, राकेश टिकैतसह परकला सीतारामन, प्रकाश राज यांची उपस्थिती

जरांगेंचा धमाका; ५०० कोटींच्या दाव्याची ऑडिओ क्लिप जारी, कट-कारस्थान रचल्याचा शिंदेसेनेचा आरोप

अनिल पंडित ‘वाँटेड’ घोषित; लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा संशय, चार आरोपींना २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

निदर्शने, आंदोलने कामाची नाहीत; राहुल गांधी यांचे नाव न घेता अमित शहा यांची टीका