PTI Photo/Gurinder
क्रीडा

समारोप सोहळ्यासाठी श्रीजेश ध्वजवाहक; नीरजशी संवाद साधल्यानंतर गोलरक्षकाला बहुमान देण्याचा IOA चा निर्णय

Swapnil S

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकच्या रविवारी रंगणाऱ्या समारोप सोहळ्यासाठी भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. तो नेमबाज मनू भाकरसह संयुक्तपणे भारताचा ध्वजवाहक असेल.

२०२०च्या टोकियो ऑलिम्पिकपासून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) लिंगभेद समानतेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने उद्घाटन तसेच समारोप सोहळ्यासाठी प्रत्येक देशाला १ महिला व १ पुरुष खेळाडू ध्वजवाहक म्हणून नेमण्याचे आदेश दिले. यंदा उद्घाटन सोहळ्यासाठी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांनी भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका बजावली. मात्र आता निरोप समारंभासाठी नेमबाजू मनूसह निवृत्ती पत्करलेला ३६ वर्षीय श्रीजेश भारताचा ध्वजवाहक असेल, असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष पी. टी. उषा यांनी जाहीर केले.

भालाफेकपटू नीरज चोप्रा मनूसह ध्वजवाहकाची भूमिका बजावणार होता. मात्र हॉकी संघाने मिळवलेले कांस्यपदक तसेच निवृत्तीसुद्धा पत्करल्याने श्रीजेशला हा मान देण्यात यावा का, असे उषा यांनी नीरजला विचारताच त्यानेही लगेच होकार दर्शवला. “मॅम तुम्ही मला विचारले नसते तरी मी श्रीजेशचेच नाव समारोप सोहळ्यासाठी सुचवले असेत,” असे नीरज आपल्याला म्हणाल्याचे उषा यांनी सांगितले.

दरम्यान, १८ वर्षांच्या कारकीर्दीत ३००हून अधिक सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करणारा श्रीजेश २०२० व २०२४च्या ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या संघाचा भाग होता. तसेच २०२३मध्ये आशियाई स्पर्धेत हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकल्यानंतर श्रीजेश समारोप सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक होता. दुसरीकडे मनूने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक दोन पदकांची कमाई केली. तिचे ध्वजवाहक म्हणून नाव काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले होते. सध्या भारतात असलेली मनू शनिवारी पुन्हा पॅरिसला परतणार आहे.

खेळाडूंवर कोट्यवधींचा वर्षाव

  • १५ लाख : हॉकी इंडिया म्हणजेच भारतीय हॉकी महासंघाकडून संघातील सर्व १६ खेळाडूंना प्रत्येकी १५ लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याशिवाय सहाय्यक फळी व प्रशिक्षकीय चमूतील सर्वांना प्रत्येकी ७.५ लाखांचे पारितोषिक देण्यात येईल.

  • १ कोटी : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हॉकी संघातील पंजाबच्या प्रत्येक खेळाडूला १ कोटींचे पोरितोषिक जाहीर केले. भारतीय संघात पंजाबचे एकूण १० खेळाडू होते. यामध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंग, उपकर्णधार हार्दिक सिंग, जर्मनप्रीत सिंग, गुर्जंत सिंग अशा काही तारांकित खेळाडूंचा समावेश होता.

  • १५ लाख : भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रायोजकत्व असलेले तसेच हॉकीसाठी सातत्याने पुढाकार घेणारे ओदिशा सरकारही मागे राहिलेले नाही. त्यानी संघातील प्रत्येकी खेळाडूसाठी १५ लाख, तर सहाय्यक फळीतील प्रत्येकाला १० लाखांचे पारितोषिक जाहीर केले आहे. त्या‌शिवाय ओदिशाचा खेळाडू असलेल्या अमित रोहिदासला ४ कोटींचे अतिरिक्त पारितोषिक देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सांगितले.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत