हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी उप्पल येथील राजीव गांधी स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत गोलंदाजांचा कस लागणार आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स अशा बेधडक फलंदाजांचा भरणा असलेल्या दोन्ही संघांमध्ये मंगळवारी लढत होणार असून विजयी सातत्य कायम राखण्यासाठी दोघेही प्रयत्नशील असतील.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील. त्यामुळे स्पर्धेचा ज्वर हळूहळू वाढत आहे.
दरम्यान, इशान किशनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादने ६ पैकी ३ सामने जिंकले आहेत. गेल्या दोन लढतींमध्ये घरच्या मैदानात त्यांनी अनुक्रमे राजस्थान व चेन्नईला पराभूत केले. त्यामुळे हैदराबादचा संघ लय मिळवत असून मंगळवारी पुन्हा एकदा घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना ते एकंदर चौथा विजय मिळवण्यासाठी आतुर असतील. अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, किशन असे डावखुरे आघाडीचे त्रिकुट तर, हेनरिच क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश रेड्डी असे मधल्या फळीतील फलंदाज हैदराबादच्या ताफ्यात आहेत. विशेषत: अभिषेक सातत्याने धुमाकूळ घालत आहे. गोलंदाजीत इशान मलिंगा, प्रफुल्ल हिंगे व साकिब हुसैन यांचे वेगवान त्रिकुट व फिरकीपटू शिवांग कुमार छाप पाडत आहेत. त्यामुळे हैदराबादला रोखणे सोपे नसेल.
दुसरीकडे अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने पाचपैकी ३ सामने जिंकले आहेत. सलग दोन सामने गमावल्यावर दिल्लीने गेल्या लढतीत अखेरच्या षटकात बंगळुरूवर मात केली. आता विजयी सातत्य कायम राखण्यासाठी हा संघ उत्सुक असेल. अनुभवी के. एल. राहुल, पथुम निसांका, समीर रिझवी असे प्रतिभावान फलंदाज दिल्लीकडे आहेत. तर अखेरच्या षटकात डेव्हिड मिलर व ट्रिस्टन स्टब्स हाणामारी करण्यात पटाईत आहेत. अक्षर गेल्या सामन्यात रिटायर्ड हर्ट झाला होता. मात्र तो तंदुरुस्त असल्याचे समजते. गोलंदाजीत लुंगी एन्गिडी व नटराजन यांची वेगवान जोडी, तर फिरकीपटू कुलदीप यादव सातत्याने चमक दाखवत आहे. हैदराबादच्या तुलनेत दिल्लीची गोलंदाजी अधिक परिपूर्ण असल्याने त्यांच्याविरुद्ध हैदराबादच्या फलंदाजांचा कस लागू शकतो.
एकूणच आता आयपीएल रंगतदार वळणावर असून प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे चित्र पालटत आहे. गतवर्षी हैदराबाद व दिल्ली या दोन्ही संघांना बाद फेरी गाठण्यात अपयश आले. त्यामुळे यंदा त्यांच्यावर कामगिरी उंचावण्याचे दडपण आहे. लढतीवर पावसाचे सावट नसल्याने चाहत्यांना चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळू शकते.
उभय संघांत आतापर्यंत २६ सामने झाले आहेत. त्यांपैकी हैदराबादने १३, तर दिल्लीने १२ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आला होता. आकडेवारीनुसार दोन्ही संघांमध्ये तितका फरक नसल्याने मंगळवारी रंगतदार लढत अपेक्षित आहे.
खेळपट्टीचा अंदाज
हैदराबादच्या खेळपट्टी क्रमांक दोनवर ही लढत होणार असून प्रथम फलंदाजी करणारा संघ नेहमीच २२० ते २३० धावा करू शकतो. तसेच येथे धावांचा पाठलाग करताना खेळपट्टी काहीशी संथ होते. अशा स्थितीत नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा निर्णायक ठरू शकतो.
प्रतिस्पर्धी संघ
सनरायजर्स हैदराबाद : इशान किशन (कर्णधार), पॅट कमिन्स, ट्रेव्हिस हेड, रविचंद्रन स्मरण, सलिल अरोरा, हेनरिच क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिषेक शर्मा, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश रेड्डी, क्रेन्स फुलेत्रा, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, शिवांग कुमार, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन, ओमकार तरमाळे, जयदेव उनादकट, झीशान अन्सारी, दिलशान मदुशंका, जेराल्ड कोएट्झे.
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, आकिब नबी, डेव्हिड मिलर, दुश्मंता चमीरा, करुण नायर, के. एल. राहुल, कुलदीप यादव, कायले जेमिसन, लुंगी एन्गिडी, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार, नितीश राणा, पथुम निसांका, पृथ्वी शॉ, साहिल पारेख, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम.