क्रीडा

किशोर-किशोरी गटात सांगली, पुरुष-महिला गटात पुणे अजिंक्य! राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा

कुपवाड येथील अकूज ड्रीमलँड येथे झालेल्या या स्पर्धेत चाहत्यांनी दररोज रोमहर्षक सामन्यांचा अनुभव घेतला.

Swapnil S

कुपवाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या मान्यतेने सांगलीत झालेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत किशोर-किशोरी गटात सांगलीने दुहेरी मुकुट पटकावला. त्याचप्रमाणे पुरुष आणि महिला गटात पुण्याने दुहेरी यश संपादन केले. धाराशीव, ठाणे, मुंबई उपनगरच्या संघांना विविध गटांत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

कुपवाड येथील अकूज ड्रीमलँड येथे झालेल्या या स्पर्धेत चाहत्यांनी दररोज रोमहर्षक सामन्यांचा अनुभव घेतला. किशोर गटाच्या अंतिम सामन्यात सांगलीने लघुत्तम आक्रमणाच्या डावात ४७ सेकंदांच्या फरकाने ठाण्यावर सरशी साधली. निर्धारीत वेळेत त्यांच्यात १४-१४ अशी बरोबरी होती. सांगलीकडून रितेश भालदार (१.५० मिनिटे संरक्षण व आक्रमणात ४ गडी), संग्राम डोबळे (२ मि.), श्री दळवी (१.३० मि., ३ गडी) यांनी अफलातून कामगिरी केली. ठाण्याकडून ओंकार सावंतने कडवी झुंज दिली.

किशोरी गटातील अंतिम लढतीत सांगलीने धाराशीववर २५-२२ अशी मात केली. मध्यांतराला दोन्ही संघांत १५-१५ अशी बरोबरी होती. वैष्णवी चाफे (१.२० मि., ७ गडी), सुवर्णा तामखडे (१.३० मि., २ गडी), पायल तामखडे (७ गडी) यांनी छाप पाडल्याने सांगलीने विजय मिळवला. धाराशीवकडून मैथिली पवार (२.३० मि., ७ गडी), मुग्धा वीर (६ गडी) यांनी अथक परिश्रम घेतले.

पुरुष गटात पुण्याने कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई उपनगरवर २०-१० असे वर्चस्व गाजवले. आदित्य गणपुले (२.३० मि., ५ गडी), शुभम थोरात (२.४० मि.), सुयश गरगटे (२ मि., २ गडी) या त्रिकुटाला पुण्याच्या विजयाचे श्रेय जाते. उपनगरकडून अनिकेत चेंदणकर (१.५० मि.), ऋषिकेश मुरचावडे (१.४० मि.) यांनी संघाच्या विजयासाठी सर्वस्व झोकून दिले. मात्र त्यांना यश लाभले नाही.

महिला गटातील अंतिम सामन्यात बलाढ्य पुण्याने धाराशीवला ११-१० असे ४.१० मिनिटे राखून नमवले. प्रियांका इंगळे (२.४० मि., ४ गडी), काजल भोर (१.३० मि., ४ गडी), कोमल धारवाडकर (२ मि.) या नामांकित खेळाडूंनी पुण्यासाठी मोलाचे योगदान दिले. धाराशीवकडून सुहानी धोत्रे (४ गडी), अश्विनी शिंदे (३ मि.) यांनी दमदार खेळ केला.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश