क्रीडा

ऑस्ट्रेलियातील दमदार कामगिरी हीच विराटच्या यशाची पावती; मालिकेबाबत सुनील गावस्कर यांचे वक्तव्य

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा धावांसाठी भुकेला आहे. ऑस्ट्रेलियातील विराटच्या मजबूत विक्रमामुळे आगामी बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत त्याचा आत्मविश्वास वाढलेला असेल, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.

Swapnil S

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा धावांसाठी भुकेला आहे. ऑस्ट्रेलियातील विराटच्या मजबूत विक्रमामुळे आगामी बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत त्याचा आत्मविश्वास वाढलेला असेल, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.

गेल्या काही महिन्यांपासून विराट खराब फॉर्ममधून जात आहे. गेल्या ६० कसोटी डावांत त्याने केवळ २ शतके आणि ११ अर्धशतके झळकावली आहेत. यंदाच्या वर्षात कसोटीतील त्याची सरासरी केवळ २२.७२ इतकीच आहे. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने केवळ ९३ धावा जमवल्या. न्यूझीलंडविरुद्ध धावा केल्या नसल्याने विराट धावांसाठी खूप भुकेला असेल, असे गावस्कर म्हणाले.

अलीकडच्या एका कसोटी सामन्यात भारतीय संघ दुसऱ्या डावात केवळ ३६ धावांवर सर्वबाद झाला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात कोहलीने ७० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या, गावस्कर म्हणाले.

सध्याचा धावांचा हा संघर्ष वगळता विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियातील कामगिरी उत्कृष्ट आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजाची सरासरी ५४.०८ इतकी आहे. ही आकडेवारी विराटला आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयोगी पडेल, असे गावस्कर यांना वाटते.

ॲडलेडमध्ये विराटने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्या मैदानाची त्याला माहिती आहे. ॲडलेडपूर्वी पर्थमध्ये सामना होणार आहे. पर्थमध्ये २०१८-१९ मध्ये झालेल्या मालिकेत कोहलीने शानदार शतक झळकावले होते. या मैदानात खेळल्याने त्याचा आत्मविश्वास वाढेल. अर्थातच सुरुवातीला त्याला भाग्याचीही साथ लागेल. जर त्याने सुरुवात चांगली केली, तर तो मोठी खेळी खेळणार हे मात्र नक्की, असा विश्वास गावस्कर यांनी व्यक्त केला.

मालिका जसजशी जवळ येईल तसे कोहलीवर सर्वांच्याच नजरा असतील. ऑस्ट्रेलियातील त्याची दमदार कामगिरी तो याही मालिकेत कायम करणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.

भारता आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पर्थ येथे होणारा मालिकेतील पहिला सामना खिशात घालून प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न दोन्ही संघाचा आहे. दरम्यान, दुखापतीने भारताची चिंता वाढवली आहे. मात्र रविवारी भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली संघाचा यष्टीरक्षक फलंदाज के. एल. राहुलने कसून सराव केला. त्यामुळे त्याच्या फिटनेसची चिंता दूर झाली आहे. तीन दिवसांपूर्वी सरावादरम्यान राहुलला दुखापत झाली होती. त्यामुळे मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र आता तो पूर्णपणे फिट असल्याचे समजते. कर्णधार रोहित शर्माला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचे समजते. त्यामुळे सलामीची चिंता भारताला सतावत आहे. मात्र दुसरीकडे केएल राहुल दुखापतीतून सावरल्यामुळे भारताला काहीसा दिलासा मिळाला आहे. भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलही ऑस्ट्रेलियात सरावादरम्यान जायबंदी झाला आहे.

ऑस्ट्रेलिया लक्ष्य कसे करणार हे कोहलीला ठाऊक - मांजरेकर

ऑस्ट्रेलिया कोहलीला कसे लक्ष्य करू शकते यावर माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी मत व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ काय करणार, याबाबत विराटला माहिती असल्याचे मांजरेकर म्हणाले. विराटची मानसिकता ओळखण्यासाठी ऑफ स्टम्पच्या बाहेरून ते गोलंदाजीला सुरुवात करतील. तो अनेकदा असे चेंडू सोडतो किंवा ड्राईव्ह करतो. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज त्याच्या शरीरावरही गोलंदाजी करू शकतात. खासकरून न्यूझीलंडने ही युक्ती वापरली होती. त्याने ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडूवर त्याने लक्ष ठेवले, तर जोश हेझलवुड स्टम्पवर गोलंदाजी करू शकतो. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज अन्य रणनीतीचा प्रयोग करू शकतात. याबाबत विराटला बऱ्यापैकी माहिती आहे.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती