क्रीडा

हेडच्या झुंजार शतकामुळे ऑस्ट्रेलिया विजयासमीप: विंडीज दुसऱ्या डावात ६ बाद ७३; हेझलवूडचे ४ बळी

ॲडलेड येथे सुरू असलेल्या या कसोटीत विंडीजचा संघ अद्यापही २२ धावांनी पिछाडीवर असून जोशुआ डा सिल्व्हा १७ धावांवर खेळत आहे.

Swapnil S

ॲडलेड : संकटमोचक ट्रॅव्हिस हेडने (१३४ चेंडूंत ११९ धावा) साकारलेल्या जिगरबाज शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ९५ धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या डावात विंडीजची जोश हेझलवूडच्या (१८ धावांत ४ बळी) भेदक माऱ्यापुढे पुन्हा भंबेरी उडाल्याने त्यांची दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ७३ अशी अवस्था आहे.

ॲडलेड येथे सुरू असलेल्या या कसोटीत विंडीजचा संघ अद्यापही २२ धावांनी पिछाडीवर असून जोशुआ डा सिल्व्हा १७ धावांवर खेळत आहे. त्यामुळे शुक्रवारी पहिल्या सत्रातच सामन्याचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. कॅमेरून ग्रीन व नॅथन लायन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला आहे. हेझलूवडने कर्णधार क्रेग ब्रेथवेट (१), तेगनारायण चंदरपॉल (०), अलिक अथान्झे (०) व कॅव्हेम हॉज (३) यांना बाद केले.

तत्पूर्वी, २ बाद ५९ धावांवरून पुढे खेळताना अन्य एकाही फलंदाजाला अर्धशतकही झळकावण्यात अपयश आलेले असताना हेडने मात्र १२ चौकार व ३ षटकारांसह कारकीर्दीतील सातवे शतक झळकावले. उस्मान ख्वाजा (४५) व लायन (२४) यांनी काहीसे योगदान दिले. शमार जोसेफने पदार्पणातच पाच बळी मिळवून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २८३ धावांत गुंडाळला.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव