क्रीडा

सुमितची घोडदौड संपुष्टात: दुसऱ्या फेरीत पराभूत; बोपण्णाचा दुहेरीत विजयारंभ

पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत चीनच्या बिगरमानांकित शँग जंचेंगने सुमितला २-६, ६-३, ७-५, ६-४ असे पिछाडीवरून चार सेटमध्ये नमवले.

Swapnil S

मेलबर्न : भारताचा तारांकित टेनिसपटू सुमित नागलची ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील घोडदौड गुरुवारी अखेर संपुष्टात आली. सुमितला दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारताचेही एकेरीतील आव्हान समाप्त झाले. पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णाने मात्र विजयारंभ केला.

पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत चीनच्या बिगरमानांकित शँग जंचेंगने सुमितला २-६, ६-३, ७-५, ६-४ असे पिछाडीवरून चार सेटमध्ये नमवले. २ तास ५० मिनिटे रंगलेल्या या सामन्यात क्रमवारीत १४०व्या स्थानी असलेल्या शँगने १३७व्या स्थानावरील सुमितच्या चुकांचा पूरेपूर लाभ उचलला. सुमितने दोन दिवसांपूर्वी पहिल्या फेरीत अलेक्झांडर बुब्लिकला चकवत ऐतिहासिक विजय नोंदवला होता. मात्र २०२०च्या अमेरिकन ओपनप्रमाणेच यावेळीही सुमित दुसऱ्या फेरीचा अडथळा ओलांडू शकला नाही. सुमितने या स्पर्धेद्वारे ९८ लाखांची कमाई केली. भारताच्या युकी भांब्रीला मंगळवारी पहिल्याच लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

पुरुष दुहेरीत बोपण्णा व त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एब्डन या दुसऱ्या मानांकित जोडीने जेम्स डकवर्थ आणि मार्क पोलमन्स या ऑस्ट्रेलियन जोडीला ७-६ (७-५), ४-६, ७-६ (१०-२) असे संघर्षपूर्ण लढतीत तीन सेटमध्ये हरवले. भारताची अन्य जोडी विजय प्रशांत व अनिरुद्ध चंद्रशेखर यांना मात्र सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला. दरम्यान, बोपण्णा मिश्र दुहेरीत हंगेरीच्या टिमी बाबोसच्या साथीने खेळणार आहे. तसेच श्रीराम बालाजी शुक्रवारी पुरुष दुहेरीत विदेशी सहकाऱ्यासह पहिला सामना खेळेल.

अल्कराझ, अझारेंका यांचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

स्पेनचा दुसरा मानांकित कार्लोस अल्कराझ, जर्मनीचा सहावा मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्ह, पोलंडची अग्रमानांकित इगा स्विआटेक, बेलारूसची १८वी मानांकित व्हिक्टोरिया अझारेंका यांनी गुरुवारी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत अल्कराझने लॉरेन्झो सोनेगोवर ६-४, ६-७ (३-७), ६-३, ७-६ (७-३) अशी चार सेटमध्ये मात केली. झ्वेरेव्हने लुकास क्लेनवर ७-५, ३-६, ४-६, ७-६ (७-५), ७-६ (१०-७) अशी पाच सेटमध्ये सरशी साधली. महिलांमध्ये अझारेंकाने क्लारा टुसानला ६-४, ३-६, ६-२ असे हरवले, तर स्विआटेकने डॅनिएल कॉलिन्सवर ६-४, ३-६, ६-४ असा विजय मिळवला. एलिना रायबॅकिना व होल्गर रून यांचे आव्हान संपुष्टात आले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?