क्रीडा

वारसदार शोधण्याचे धोनीपुढे आव्हान; यापुढील हंगामांमध्ये चेन्नईच्या कर्णधारपदासाठी ऋतुराज शर्यतीत, रैनाचे मत

Swapnil S

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १७वा हंगाम शुक्रवारपासून सुरू होणार आहे. या हंगामात महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा वारसदार म्हणजेच भविष्यातील कर्णधार कोण, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यावर भर द्यावा, असे चेन्नईचाच माजी खेळाडू व धोनीचा खास मित्र सुरेश रैनाने सुचवले आहे.

४२ वर्षीय धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने तब्बल पाच वेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. गत‌वर्षी चेन्नईने गुजरात टायटन्सला नमवून आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरले. पहिल्या हंगामापासून धोनीच चेन्नईचा कर्णधार आहे. २०२२मध्ये धोनीने रवींद्र जडेजाकडे चेन्नईच्या संघाचे कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ६ ते ७ सामन्यांत चेन्नईला अपयश आल्यानंतर जडेजाने कर्णधारपद सोडून दिले. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा चेन्नईचा कर्णधार झाला. त्या हंगामात चेन्नईला नवव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. यंदा २२ मार्च रोजी धोनीचा चेन्नई संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सलामीची लढत खेळणार आहे.

“चेन्नईच्या संघाने गेल्या काही वर्षांत असंख्य क्रिकेटपटूंच्या कारकीर्दीला आकार दिला. २०२३ हे वर्ष धोनीचे अखेरचे असेल, असे अनेकांना वाटले होते. मात्र तो अजूनही तंदुरुस्त आहे. या हंगामातसुद्धा चेन्नई जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. मात्र त्यापेक्षाही धोनीचे मुख्य लक्ष्य हे त्याचाच वारसदार शोधण्याचे असेल. चेन्नईचा पुढील कर्णधार कोण असेल, याचे उत्तर चाहत्यांना अद्यापही मिळालेले नाही,” असे रैना म्हणाला.

“२०२२मध्ये जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्याचा चेन्नईचा निर्णय फसला. त्याचा पर्याय आताही उपलब्ध आहे. मात्र ऋतुराज गायकवाडकडे चेन्नईचे कर्णधारपद सोपवणे भविष्याच्या दृष्टीने सोयीचे ठरेल. धोनीचे त्याच्यावर सातत्याने लक्ष असते. त्यामुळे ऋतुराजची कामगिरी चेन्नईसाठी पुन्हा एकदा निर्णायक ठरेल. त्याशिवाय अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर यांनी रणजी स्पर्धेत मुंबईसाठी धडाकेबाज कामगिरी केली. त्यांचा खेळ पाहण्यासाठी मी आतुर आहे,” असेही ३७ वर्षीय रैनाने नमूद केले.

क्रिकेटच्या पलीकडेही जीवन, हे धोनी जाणून!

क्रिकेट हा आयुष्याचा एक भाग आहे. मात्र त्या पलीकडेही जीवन आहे, हे धोनीने लवकरच जाणून घेतले. त्यामुळे तो निवृत्तीनंतरही अजून तंदुरुस्त असून आयपीएलमध्ये त्याच जोशात खेळताना दिसतो, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने व्यक्त केले. “आयपीएल संपल्यानंतर धोनी बाईकस्वारी करताना दिसतो. कधी तो शेतात काम करताना आढळतो, तर कधी भारतीय जवानांसोबतही वेळ व्यतित करताना दिसतो. क्रिकेटव्यतिरिक्त जीवन कसे जगावे, हे धोनीला ठाऊक आहे. या सर्व काळात तो तंदुरुस्तीकडे कधीच दुर्लक्ष करत नाही,” असे झहीर म्हणाला.

धोनी आणखी २ वर्षे खेळणार!

धोनी सध्या ४२ वर्षांचा असला तरी तो किमान पुढील २ ‌वर्षे आयपीएल खेळू शकतो. कदाचित तो त्यावेळी फक्त फलंदाज म्हणून खेळेल. त्यापुढेही धोनीने तंदुरुस्ती राखून स्वत:ला उपलब्ध ठेवले, तर तो एक चमत्कारच म्हणावा लागेल, असे मत रैनाने नोंदवले.

मुंबई ते विदर्भ अजून सुसाट! समृद्धी महामार्गाचा होणार विस्तार; 'या' तीन जिल्ह्यांना फायदा

Mumbai Local : ठाण्याला सिग्नल फेल, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे कोलमडली; चाकरमान्यांचे हाल

"मिस्टर राज, तुमच्यात अन् माझ्यात एक फरक...", सुषमा अंधारेंचे राज ठाकरेंना उत्तर

निवडणुकीनंतर बेस्ट बस सेवा ठप्प होणार? कंत्राटी कामगारांचा पुन्हा संपाचा इशारा

चौथ्या टप्प्यातील मतदान आज; रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, अमोल कोल्हेंसह २९८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार