कॅनबरा : भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या वैयक्तिक कामगिरीबाबत आपल्याला काहीही चिंता नाही. कर्णधार म्हणून तो छाप पाडत असून लवकरच फलंदाजीतही चमक दाखवेल, असा विश्वास प्रशिक्षक गौतम गंभीरने व्यक्त केला.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवार, २९ ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. त्यानिमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीरने सूर्यकुमारचे महत्त्व अधोरेखित केले. सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने सप्टेंबरमध्ये आशिया चषकाचे जेतेपद मिळवले. त्या स्पर्धेत सूर्यकुमारला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. मात्र तरीही गंभीरने त्याची पाठराखण केली आहे.
दरम्यान, आता २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघबांधणी करण्याच्या हेतूने आता ३८ वर्षीय रोहितकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेत २५ वर्षीय गिलकडे सोपवण्यात आले आहे. तो टी-२० संघाचाही उपकर्णधार आहे.
झाम्पाच्या जागी तन्वीर ऑस्ट्रेलियन संघात
लेगस्पिनर ॲडम झाम्पा भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या जागी २३ वर्षीय फिरकीपटू तन्वीर संघाला ऑस्ट्रेलियाने स्थान दिले आहे. झाम्पाची पत्नी लवकरच दुसऱ्या अपत्याला जन्म देणे अपेक्षित आहे. त्यामुळे झाम्पा कुटुंबासोबत राहणार आहे. २९ व ३१ ऑक्टोबरच्या सामन्यांना तो मुकू शकतो. त्यामुळे २ नोव्हेंबरला होणाऱ्या तिसऱ्या लढतीसाठी झाम्पा परतेल, असे अपेक्षित आहे.