सूर्यकुमार, राहुल, पंत दुलीप करंडक स्पर्धेत खेळणार canva
क्रीडा

सूर्यकुमार, राहुल, पंत दुलीप करंडक स्पर्धेत खेळणार

Swapnil S

बंगळुरू : सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि के. एल. राहुल हे अनुभवी फलंदाजांचे त्रिकुट आगामी दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा असे वरिष्ठ त्रिकुट मात्र या स्पर्धेत सहभागी होणार नाही, असेच सध्या दिसते.

भारताचा श्रीलंका दौरा समाप्त झाल्यानंतर आता थेट सप्टेंबरमध्ये भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र बीसीसीआयच्या धोरणानुसार आंतरराष्ट्रीय मालिका नसल्यास खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणे गरजेचे आहे. तसेच बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवड करताना दुलीप करंडकातील कामगिरीचा विचार करण्यात येईल. त्यामुळे ५ सप्टेंबरपासून रंगणाऱ्या दुलीप करंडक या लाल चेंडूने खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेत यावेळी अनेक भारतीय संघातील खेळाडू खेळताना दिसतील.

सूर्यकुमार, राहुल व पंत हे तिघेही सध्या भारताच्या कसोटी संघाचा भाग नाहीत. राहुलला दुखापतीमुळे मार्चमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागले. पंत २०२२पासून कसोटी सामना खेळलेला नाही. अपघातातून सावरत पुनरागमन केल्यानंतर आता तो कसोटी संघातही स्थान मिळवण्यास आतुर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ध्रुव जुरेल, सर्फराझ खान या युवांनी दमदार कामगिरीसह लक्ष वेधले. त्यामुळे अनुभवी खेळाडूंना संघात स्थान मिळवण्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागेल.

भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध १९ सप्टेंबरपासून चेन्नईत पहिली, तर कानपूर येथे २७ सप्टेंबरपासून दुसरी कसोटी खेळणार आहे. २०२३च्या दुलीप स्पर्धेत दक्षिण विभागाने विजेतेपद मिळवले. यंदा मात्र या स्पर्धेत विभागानुसार संघ नसून त्यांना भारत-अ, ब, क, ड अशी नावे देण्यात आली आहेत.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला