मुंबई : आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे. शार्दूल ठाकूर मुंबईचे नेतृत्व करणार असून शिवम दुबे, सर्फराझ खानही या संघात आहेत.
२६ नोव्हेंबरपासून देशातील विविध शहरांत मुश्ताक अली ही देशांतर्गत टी-२० स्पर्धा सुरू होणार आहे. रणजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सर्व संघांचे पाच साखळी सामने झाल्यावर आता मुश्ताक अली व त्यानंतर विजय हजारे ही देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा खेळवण्यात येईल. मुंबईचा संघ हा मुश्ताक अली स्पर्धेचा गतविजेता आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मुंबईने जेतेपद मिळवले होते. मात्र यंदा श्रेयस जायबंदी असल्याने शार्दूल मुंबईचे नेतृत्व करणार आहे. अ-गटात मुंबईसह केरळ, छत्तीसगड, विदर्भ, आंध्र प्रदेश, रेल्वे, ओदिशा, आसाम अशा एकूण आठ संघांचा समावेश आहे. २६ तारखेला रेल्वेविरुद्धच्या लढतीने मुंबई आपल्या अभिनायास प्रारंभ करणार आहे. मुंबईचे साखळी सामने लखनऊ येथे होतील.
दरम्यान, ३५ वर्षीय सूर्यकुमार गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये संघर्ष करत आहे. आयपीएल २०२५मध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावणाऱ्या सूर्याला गेल्या १५ टी-२० सामन्यांत १८४ धावाच करता आल्या आहेत. या लढतींमध्ये त्याची सरासरी (१५.३३) व स्ट्राइक रेट (१२७) दोन्हीही खाली घसरले. त्यामुळेच आता आफ्रिकेविरुद्ध ९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळताना दिसेल. त्याने गेले दोन दिवस डी. वाय. पाटील स्टेडियमवर सरावही केल्याचे समजते.
आफ्रिकेनंतर भारतीय संघ जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध ५ टी-२० सामने खेळणार आहे. मग थेट फेब्रुवारीतील विश्वचषकासाठी भारताला तयारी करावी लागेल. त्यामुळे सूर्यकुमारसह दुबे आणि अन्य खेळाडूंनाही विश्वचषकापूर्वी लय मिळवण्याची व संघातील स्थानासाठी दावेदारी सादर करण्याची उत्तम संधी आहे.
मुंबईचा संघ
शार्दूल ठाकूर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, आयुष म्हात्रे, अंक्रिश रघुवंशी, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, सर्फराझ खान, शिवम दुबे, साईराज पाटील, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, अर्थव अंकोलेकर, तनुष कोटियन, शम्स मुलानी, तुषार देशपांडे, इरफान उमैर, हार्दिक तामोरे.