मुश्ताक अली टी-२० स्पर्धा : मुंबईचा सलग चौथा विजय; दुबेची प्रभावी गोलंदाजी, अंक्रिशचे अर्धशतक; छत्तीसगडवर वर्चस्व 
क्रीडा

मुश्ताक अली टी-२० स्पर्धा : मुंबईचा सलग चौथा विजय; दुबेची प्रभावी गोलंदाजी, अंक्रिशचे अर्धशतक; छत्तीसगडवर वर्चस्व

अष्टपैलू शिवम दुबेच्या (२१ धावांत ३ बळी) प्रभावी गोलंदाजीला अंक्रिश रघुवंशीच्या ६३ चेंडूंतील नाबाद ८४ धावांच्या खेळीची योग्य साथ लाभली. त्यामुळे मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेत छत्तीसगडवर ९ गडी व ७ चेंडू शानदार विजय मिळवला.

Swapnil S

कोलकाता : अष्टपैलू शिवम दुबेच्या (२१ धावांत ३ बळी) प्रभावी गोलंदाजीला अंक्रिश रघुवंशीच्या ६३ चेंडूंतील नाबाद ८४ धावांच्या खेळीची योग्य साथ लाभली. त्यामुळे मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेत छत्तीसगडवर ९ गडी व ७ चेंडू शानदार विजय मिळवला. मुंबईचा हा पाच सामन्यांतील चौथा विजय असून त्यांची एक लढत पावसामुळे रद्द झाली होती. त्यामुळे एकूणच मुंबईने अपराजित राहत ड-गटात अग्रस्थान कायम राखले आहे.

रविवारी ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात मुंबईने छत्तीसगडचे १६० धावांचे आव्हान अवघ्या १८.५ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. रघुवंशीने ६३ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ८४ धावा फटकावल्या. त्याला मुशीर खानने आक्रमक फलंदाजी करताना उत्तम साथ दिली. मुशीरने अवघ्या १६ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २९ धावा केल्या. हार्दिक तामोरेनेही ३४ चेंडूंत ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. रघुवंशी आणि तामोरे यांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करत मुंबईच्या विजयाचा पाया रचला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी छत्तीसगडचा डाव १८.२ षटकांत १५९ धावांवर गुंडाळला. शिवम दुबेने ३.२ षटकांत अवघ्या २१ धावा देत तीन फलंदाजांना माघारी धाडले. तुषार देशपांडे आणि मॅक्सवेल स्वामीनाथन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. छत्तीसगडने सुरुवातीला आक्रमक फलंदाजी केली. १७ वर्षीय कर्णधार विकल्प तिवारीने अवघ्या १८ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ४१ धावा फटकावत मुंबईच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. मात्र, राहुल प्रधान (५) आणि अमनदीप खरे (१४) लवकर बाद झाले. देव आदित्य सिंहला (४) शार्दुल ठाकूरने बाद केले.

सातव्या षटकात ७८ धावांवर तिवारी बाद झाल्यानंतर छत्तीसगडच्या मधल्या फळीची घसरण सुरू झाली. विजय यादव (११), अजय मंडल (१०) आणि यष्टिरक्षक शशांक चंद्राकर (१) यांना मोठी खेळी करता आली नाही. प्रतीक यादवने २० चेंडूंत १४ धावा केल्या. त्यानंतर जयंत यादव आणि धर्मेंद्रसिंह जडेजा यांनी नवव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी करत संघाला सावरले. जयंतने १६ चेंडूंत २४, तर जडेजाने २० चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांसह २८ धावा केल्या. मात्र, शिवम दुबेने या दोघांनाही लागोपाठ बाद करत छत्तीसगडचा डाव संपुष्टात आणला.

१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. तामोरे बाद झाल्यानंतर रघुवंशी आणि मुशीर यांनी कोणतीही पडझड होऊ न देता संघाला विजय मिळवून दिला. रघुवंशीला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबईची पुढील लढत २४ तारखेला ओदिशाविरुद्ध होईल.

पृथ्वीच्या अर्धशतकानंतरही महाराष्ट्राचा पराभव

अक्षत रघुवंशीच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर मध्य प्रदेशने क-गटातील अटीतटीच्या सामन्यात महाराष्ट्रावर अवघ्या ५ धावांनी विजय मिळवला. रविवारी झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने विजयासाठी अखेरपर्यंत जोरदार प्रयत्न केले. मात्र निर्धारित २० षटकांत त्यांना ६ बाद २०३ धावांपर्यंतच मजल मारता आली. मध्य प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २०८ धावा उभारल्या होत्या. अक्षत रघुवंशीने अवघ्या २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. मग महाराष्ट्राकडून पृथ्वी शॉ आणि साहिल पारख यांनी पहिल्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. पृथ्वीने ३४ चेंडूंत ५१ धावा केल्या, तर साहिलने २० चेंडूंत ५० धावांची खेळी केली. मात्र मधली फळी ढेपाळल्याने महाराष्ट्र पराभूत झाला.

गुणतालिका कशी?

मुंबईचे ५ सामन्यांत ४ विजय व १ रद्द लढतीचे मिळून १८ गुण आहेत. विदर्भाचेदेखील ५ सामन्यांत तितकेच गुण आहेत. मात्र त्यांची धावगती (०.८९०) मुंबईच्या तुलनेत (२.०३३) कमी असल्याने ते ड-गटात दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उद्यानात पोलीस गस्त, सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक मागणीला केराची टोपली; उद्यान समिती अध्यक्षांचे पत्र दुर्लक्षितच

पुण्यात १९ विदेशी महिलांचे बेकायदा वास्तव्य

सरकारची खऱ्या प्रश्नांना बगल - अभिजीत दीपके

कुख्यात दाऊद टोळीच्या गुंडाला दुबईत अटक

कोयनेचे पाणी आता मुंबईकडे वळवणार