मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचा थरार आजपासून 
क्रीडा

मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचा थरार आजपासून

देशातील प्रमुख स्थानिक टी-२० स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडकाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. युवा खेळाडूंसाठी आयपीएलमध्ये स्थान मिळवण्याची ही मोठी संधी ठरणार आहे. दुसरीकडे, गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजणारे अनुभवी खेळाडूही या स्पर्धेतून आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील.

Swapnil S

मुंबई : देशातील प्रमुख स्थानिक टी-२० स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडकाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. युवा खेळाडूंसाठी आयपीएलमध्ये स्थान मिळवण्याची ही मोठी संधी ठरणार आहे. दुसरीकडे, गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजणारे अनुभवी खेळाडूही या स्पर्धेतून आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील.

आगामी आयपीएलचा मिनी लिलाव १६ डिसेंबर रोजी गोव्यात होणार आहे. त्याच्या अवघ्या दहा दिवस आधी मुश्ताक अली स्पर्धेची सांगता होणार असल्याने आयपीएल फ्रँचायझींचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे. नव्या खेळाडूंचा शोध घेण्याबरोबरच संघातील कमकुवत जागा भरून काढण्यासाठी फ्रँचायझींना ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.

एकेकाळी भारतीय क्रिकेटचे भविष्य मानल्या गेलेल्या पृथ्वी शॉला गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून करार मिळूनही एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. २०२५ च्या लिलावात दुर्लक्षित राहिल्यानंतर यंदा एसएमएटीमध्ये दमदार कामगिरी करून आयपीएलमध्ये स्थान मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

अनुभवी दीपक चहर, मनीष पांडे यांच्यासह शिखर मोहन, प्रशांत वीर, शशांक सिंग आणि दिग्वेश राठी यांच्याकडेही लक्ष असेल. उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू प्रशांत वीर याला मागील आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्जने १४.२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र, मिळालेल्या मर्यादित संधींचा त्याला फायदा उठवता आला नाही. यंदा तो आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी उत्सुक असेल.

अवघ्या १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी बिहार संघाचे पहिल्या दोन सामन्यांत नेतृत्व करणार आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीने चर्चेत आलेल्या वैभवकडून या स्पर्धेतही मोठ्या खेळींची अपेक्षा आहे.

गेल्या वर्षभरात अडचणींचा सामना करणाऱ्या यश दयाल आणि अभिषेक पोरेल यांच्यासाठीही ही स्पर्धा महत्त्वाची आहे. यश दयालवर लैंगिक अत्याचारासंबंधी आरोप झाल्यानंतर त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून मागील आयपीएल हंगामात खेळता आले नव्हते. आता उत्तर प्रदेशकडून खेळताना चेंडूने प्रभावी कामगिरी करण्याचे त्याचे लक्ष्य असेल.

अभिषेक पोरेललाही लैंगिक अत्याचाराच्या कथित प्रकरणात अटकेनंतर कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला होता. दिल्ली कॅपिटल्समधील आपले स्थान मजबूत करण्यासाठी त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. मात्र, यष्टिरक्षकाच्या जागेसाठी ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्याशी त्याची स्पर्धा असेल.

गतविजेता झारखंड यंदा सलग दुसऱ्या विजेतेपदासाठी मैदानात उतरेल. मात्र, सुरुवातीच्या सामन्यांत कर्णधार इशान किशन आणि कुमार कुशाग्र यांची अनुपस्थिती संघाला जाणवू शकते.

सूर्यकुमारच्या कामगिरीकडे लक्ष

भारतीय संघात पुनरागमनाची आशा कायम असलेले मोहम्मद शमी, टी-२० विश्वचषक विजेता माजी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू शार्दुल ठाकूर यांच्यासाठीही ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या शमीला चांगली कामगिरी करून आयपीएलमधील आपले स्थान मजबूत करायचे आहे. भारतीय संघात पुनरागमनाची शक्यता कमी असली तरी आयपीएलमधील संधी त्याच्यासाठी महत्त्वाची असेल. २०२६च्या टी-२० विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला मात्र फलंदाजीतील खराब फॉर्ममुळे संघातील स्थान गमवावे लागले होते. आता आपल्या टीकाकारांना उत्तर देण्यासाठी तो उत्सुक असेल. सूर्यकुमार मुंबईचे नेतृत्व करणार आहे.

राईडपूर्वीच 'टिप' मागणे OLA ला पडले महागात

मोदी माझा फोन टॅप करतात...; राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप

नियोजित आंदोलनापूर्वी वांगचुक यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; घराबाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

मायक्रोसॉफ्ट सेवा ठप्प; तांत्रिक बिघाडाचा फटका आशियापासून अमेरिकेपर्यंत

भारतीय युवकांसमोर आज पाकिस्तानचे कडवे आव्हान; १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याची चर्चा