मुंबई : शाश्वत जगतापच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर ईगल ठाणे स्ट्रायकर्सने सोमवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी-२० मुंबई लीग २०२६च्या सलामीच्या सामन्यात बांद्रा ब्लास्टर्सवर नऊ गडी राखून एकतर्फी विजय नोंदवत आपल्या मोहिमेची दणदणीत सुरुवात केली. १ ते १३ जून या कालावधीत स्पर्धेचा चौथा हंगाम रंगणार असून यावेळी पुरुषांच्या बरोबरीनेच महिलांची पहिली टी-२० मुंबई लीगदेखील होणार आहे.
‘फेस ऑफ द लीग’ म्हणजेच स्पर्धेचा तारांकित चेहरा असलेल्या रोहित शर्माने उद्घाटन दिनाच्या उत्साहात भर घातली. वानखेडे स्टेडियमवर मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स आणि आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स यांच्यातील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीला त्याने हजेरी लावली. यावेळी रोहितसोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि लीग नियामक परिषदेचे अध्यक्ष राजदीप गुप्ता यांच्यासह एमसीए एपेक्स कौन्सिल आणि लीग नियामक परिषदेचे सदस्यही उपस्थित होते.
तत्पूर्वी, १९० धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना स्ट्रायकर्सने शाश्वत आणि इम्पॅक्ट प्लेअर सुमेर झवेरी यांच्या सलामीच्या बळावर ब्लास्टर्सला हैराण केले. या जोडीने पॉवरप्लेमध्ये ९३ धावांपर्यंत मजल मारली. मग या जोडीने सलामीच्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी केली. सुमेइर अवघ्या ३६ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि चार षटकारांसह शानदार ८० धावांची खेळी करून बाद झाला. मात्र, शाश्वत शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने अवघ्या ५० चेंडूंमध्ये एक शानदार शतक पूर्ण करून स्ट्रायकर्सला सहज विजय मिळवून दिला, तसेच भारतातील एका प्रमुख फ्रँचायझी-आधारित देशांतर्गत टी२० स्पर्धेत त्यांना एक उत्तम सुरुवात करून दिली.
तत्पूर्वी, बांद्रा ब्लास्टर्सने डळमळीत सुरुवातीनंतर चांगली कामगिरी करत १८९/९ धावा केल्या. कर्णधार सुवेद पारकर (३०) आणि पराग खानापूरकर (१६) यांनी ४५ धावांची भागीदारी करून डाव सावरला.
मंगळवारी टी-२० मुंबई महिला लीगच्या पहिल्या हंगामाला सुरुवात होईल आणि लीगच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची भर पडेल. या हंगामातील पहिलाच सामना सकाळी ९:३० वाजता सोबो मुंबई फाल्कन्स आणि ठाणे स्कायरायझर्स यांच्यात खेळला जाईल. सर्व सामने जिओहॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील.