अहिल्यानगर : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्यात झालेल्या लढतीवेळी पंचांनी दिलेल्या निर्णयावर अनेकांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली. दरम्यान या लढतीची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य संघाने तज्ज्ञ समितीची नेमणूक केली आहे. या समितीच्या प्रमुखपदी आंतरराष्ट्रीय पंच प्रा. विलास कथुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चार तज्ज्ञ पदाधिकाऱ्यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. ही समिती किताबी लढतीतील पंचांच्या वादग्रस्त निर्णयाची सखोल चौकशी करून २८ फेब्रुवारीपर्यंत राज्य संघाकडे अहवाल सादर करणार असल्याची माहिती संघाचे सचिव योगेश दोडके यांनी दिली.
याबाबत योगेश दोडके यांनी सांगितले की, अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी विभागाची लढत पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्यात झाली होती. या लढतीतील निकालाबाबत अनेकजणांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे ही कुस्ती मोहोळ याने जिंकल्याचा आरोप होत आहे.
या निकालाबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चेचा विचार करून राज्य संघाने याबाबत ५ जणांची चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या चौकशी समितीच्या प्रमुखपदी प्रा. विलास कथुरे, सदस्य म्हणून प्रा. दिनेश गुंड (पुणे), सुनील देशमुख (जळगाव), शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू नामदेव बडरे (सांगली) व राष्ट्रीय खेळाडू विशाल बलकवडे (नाशिक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.