क्रीडा

रहाणेला उपकर्णधारपद देण्याचा निर्णय अनाकलनीय - गांगुली

पुढील काही सामने रहाणे अपयशी ठरला, तर त्याला वयाचे कारण देऊन पुन्हा संघाबाहेर केले जाऊ शकते,” असे गांगुली म्हणाला.

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : जवळपास १८ महिने संघाबाहेर राहिल्यानंतर एका सामन्यातील कामगिरीद्वारे अजिंक्य रहाणेची भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी पुन्हा नेमणूक करण्याचा राष्ट्रीय निवड समितीचा निर्णय अनाकलनीय आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने व्यक्त केली आहे.

मुंबईकर रहाणेने स्थानिक क्रिकेट तसेच आयपीएलमधील चमकदार कामगिरीच्या बळावर डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात पुनरागमन केले. भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. या लढतीत ३५ वर्षीय रहाणेने अनुक्रमे ८९ आणि ४६ अशा भारतातर्फे सर्वाधिक धावा केल्या. त्यानंतर नुकताच विंडीज दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कसोटी संघात त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले. या निर्णयावर गांगुलीने मत मांडले आहे.

“रहाणेला एका लढतीतील कामगिरीच्या आधारावर लगेच उपकर्णधारपद देऊन निवड समिती काय दर्शवू इच्छिते. माझ्यामते शुभमन गिल किंवा अन्य कुणाला ही जबाबदारी देता आली असती. पुढील काही सामने रहाणे अपयशी ठरला, तर त्याला वयाचे कारण देऊन पुन्हा संघाबाहेर केले जाऊ शकते,” असे गांगुली म्हणाला.

“रहाणेच्या निर्णयामुळे भारताचे नुकसान होईल, असे नाही. परंतु एखादा खेळाडू १८ महिन्यांनी संघात परततो. एका सामन्यात खेळतो व लगेच उपकर्णधार होतो, यामागे मला नेमका काय विचार आहे, हे समजलेले नाही,” असेही गांगुलीने नमूद केले.

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समावेशाकडे लागले लक्ष... युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर केलेली बदली रद्द; सहाय्यक प्राध्यापक महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा

भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा

हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट; शुल्क कमी न केल्यास ‘हॉटेल बंदचा’ व्यावसायिकांचा इशारा