क्रीडा

मुंबईत आज ‘टी-ट्वेन्टी’; हार्दिकची ‘कसोटी’

प्रतिनिधी

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी जानेवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. विराट कोहली, रोहित शर्मा,के. एल. राहुल या त्रिमूर्तींच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याची नियमित कर्णधार म्हणून कसोटी लागणार आहे. त्यामुळे मालिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाल्यानंतर संघात अनेक बदल करण्यात आले. या बदलांसह भारतीय संघाची ही पहिलीच टी-२० मालिका असणार आहे. भारताचा युवा संघ आशिया चषक विजेत्या श्रीलंकेशी भिडणार आहे. कर्णधार म्हणून हार्दिकपुडे पहिल्या सामन्यासाठी सर्वप्रथम प्लेईंग इलेव्हन ठरविण्याचे जटील आव्हान असणार आहे. त्यानंतर पुढील आव्हानांमध्येही त्याची कसोटी लागणार आहे. हार्दिकला संघनिवड करताना काही कठोर निर्णयदेखील घ्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. रोहित शर्मा, के एल राहुल, विराट कोहली यांची जागा कोण घेणार, ते हार्दिकला संघ व्यवस्थापनाला विश्वासात घेऊन निश्चित करावे लागणार आहे. अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे हार्दिकपुढे बाका प्रसंग उभा राहण्याची शक्यता आहे.

यापूर्वी बॅकअप प्लॅनचा भाग म्हणून टीम इंडियात असलेल्या इशान किशनला आता त्याला सलामीवीर म्हणून आजमावून पाहण्याची संधी आहे. इशानने नुकतेच बांगलादेशविरूद्धच्या वन-डे सामन्यात द्विशतक झळकाविले होते. शिवाय, त्याने रणजी करंडक स्पर्धेत देखील आक्रमक शतकी खेळी केली होती. मात्र इशानच्या टी-२० कारकिर्दित सातत्याचा अभाव असल्याने व्यवस्थापन कोणता निर्णय घेते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सलामीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इशानसोबतच ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते, असाही तर्क व्यक्त केला जात आहे. भारताकडून खेळताना त्याला उपलब्ध संधीचा फायदा उठविता आलेला नसला, तरी एक पर्याय म्हणून तो आजमावून पाहिला जाऊ शकतो. शुभमन गिल, राहुल त्रिपाठी असे अन्य काही पर्यायदेखील सलामीसाठी उपलब्ध आहेत. संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव हे दोन पर्याय असले, तरी त्यांची जागा मधल्या फळीतच फिट होऊ शकते, असे सांगण्यात येते.

संधी मिळाल्यास शुभमन गिलचे ते टी-२० पदार्पण ठरेल. गिल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवड झाली होती; पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. गिल फॉर्ममध्ये असेल, तर तो कुठल्याही गोलंदाजी आक्रमणाची वाट लावू शकतो.

सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजीला येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यावर उपकर्णधारपदाचीदेखील जबाबदारी असणार आहे. सूर्यकुमारने न्यूझीलंड दौऱ्यावर टी-२० मध्ये शतकी खेळी केली होती. हाच फॉर्म त्याला २०२३ मध्येदेखील कायम टिकवावा लागेल. संजू सॅमसन हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचे संकेत आहेत. कर्णधार हार्दिक स्वत: पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्यास पसंती देण्याची शक्यता आहे.

२०२३ मध्ये भारताची ही पहिली मालिका आणि पहिला आंतरराष्ट्रीय सामना असल्याने भारतीय संघ या नव्या वर्षाची सुरुवात धडाकेबाज विजयाने करण्याचा प्रयत्न करेल, अशी अपेक्षा आहे.

श्रीलंकेचा संघ प्रीमियर लीग खेळल्यानंतर भारतात येत आहे. लीगमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा संघात समावेश आहे.

भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार), पथुम निशांका, अविष्का फर्नांडो, सदीरा समराविक्रम, कुशल मेंडिस, भानुका राजपक्षे, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, वानिंदू हसरंगा (उपकर्णधार), महिष तिक्षाना, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसून रजिथा, दुनिथ वेलगे, प्रमोद मुधुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा.

ठाकरेंसाठी मोदींची साखरपेरणी; बाळासाहेबांवर स्तुतिसुमने

प्रज्वल, रेवण्णा नव्याने अडचणीत

‘वंदे भारत मेट्रो’ पश्चिम रेल्वेवर धावणार? मुंबईत पहिली ट्रेन जुलैमध्ये येण्याची शक्यता

केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर विचार होऊ शकतो; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे संकेत

अकोला : दोन कारची भीषण टक्कर, ६ जण ठार ; आमदार सरनाईकांच्या नातलगांचा मृतांमध्ये समावेश