क्रिकेट जगतातील सर्वांत मोठ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) मीडिया राईट्सची टेंडर प्रक्रिया जवळपास संपत आली असून येणाऱ्या पाच वर्षांसाठीच्या आयपीएल मीडिया राईट्सची ई-लिलाव प्रक्रिया १२ जूनला सुरू होण्याची शक्यता आहे.
एका वृत्तानुसार आयपीएलच्या डिजिटल स्ट्रिमिंग राईट्ससाठी जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जेफ बेझोस यांची अॅमेझॉन आणि मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स यांच्यात रस्सीखेच आहे. मात्र ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार अॅमेझॉन या रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिलायन्सची दावेदारी प्रबळ होण्याची शक्यता दिसत आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार आयपीएलच्या सुमारे ६० हजार कोटी रुपयांच्या मीडिया राईट्स मिळविण्याच्या शर्यतीमधून अॅमेझॉन बाहेर पडण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या या जायंट कंपनीने भारतात यापूर्वीच सुमारे सहा बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे अॅमेझॉनला आता फक्त आयपीएलच्या स्ट्रिमिंग राईटसाठी अजून गुंतवणूक करणे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य वाटत नाही. मात्र अॅमेझॉनच्या प्रतिनिधींनी अधिकृतरीत्या याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. जर अॅमेझॉन डिजिटल स्ट्रिमिंग राईट मिळवण्याच्या शर्यतीतून बाहेर पडली तर याचा फायदा मुकेश अंबानींना होण्याची शक्यता आहे. याचबरोबर डिजिटल मीडिया राईट्ससाठी रिलायन्स, डिज्ने आणि सोनी ग्रुप यांच्यात रस्सीखेच होणार आहे. सध्या तरी यामध्ये रिलायन्सची दावेदारी तगडी दिसत आहे. ज्या कोणत्या कंपनीला मीडिया राईट्स मिळतील ती कंपनी १४० कोटी लोकांच्या देशात एक प्रमुख मीडिया प्लेअर म्हणून आपली ओळख मजबूत करू शकते. सध्या आयपीएलचे लाईव्ह स्ट्रिमिंगचे राईट डिज्ने प्लस हॉटस्टार यांच्याकडे आहेत.