क्रीडा

दोन माजी कसोटीपटूंचा उलगडणार जीवनप्रवास

लोकमान्य सेवा संघात होणाऱ्या ‘गट्स अँड ग्लोरी’ या कार्यक्रमात उभयतांशी गप्पांचे आयोजन करण्यात आले

प्रतिनिधी

द ग्रेट वॉल’ अंशुमन गायकवाड आणि ७० च्या दशकात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय मध्यमगती गोलंदाजीचे प्रतिनिधित्व करणारे उमेश कुलकर्णी यांचा जीवनप्रवास विलेपार्ले येथे शनिवार १७ सप्टेंबर रोजी उलगडणार आहे. एजिस फेडरल लाइफ इन्श्युरन्सच्या वतीने विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात होणाऱ्या ‘गट्स अँड ग्लोरी’ या कार्यक्रमात उभयतांशी गप्पांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात क्रिकेट समीक्षक, निवेदक द्वारकानाथ संझगिरी यांच्या खुमासदार शैलीत गायकवाड आणि कुलकर्णी आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील आठवणींना उजाळा देतील. या कार्यक्रमाला माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, करसन घावरी यांसह क्रिकेटविश्वातील आजी-माजी खेळाडू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

एजिस फेडरल लाइफ इन्श्युरन्सतर्फे दरवर्षी क्रिकेटविश्वात उल्लेखनीय काम करणाऱ्या दोन माजी क्रिकेटपटूंना प्रत्येकी ५० हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येते. याआधी वासू परांजपे, पद्माकर (पॅडी) शिवलकर, पांडुरंग साळगावकर, चंदू पाटणकर, सुधीर नाईक, करसन घावरी, चंदू बोर्डे आणि मिलिंद गुंजाळ या माजी खेळाडूंना गौरवण्यात आले आहे. मुंबईत जन्मलेल्या अंशुमन गायकवाड यांनी १९७४च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या बचावात्मक शैलीने त्यांनी विंडीजच्या वेगवान तोफगोळ्यासमोरही अप्रतिम फलंदाजी करत सर्वांची मने जिंकली. ४० कसोटींमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी २ शतकांसह १९८५ धावा उभारल्या. पाकिस्तानविरुद्ध जालंधर येथे केलेली सर्वाधिक २०१ धावांची खेळी आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

अलिबाग येथे जन्मलेल्या उमेश कुलकर्णी यांनी १९६७-६८ सालच्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात चार कसोटी सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले. या दौऱ्यात फक्त पाच विकेट्स मिळवणाऱ्या उमेश कुलकर्णी यांना फारशी छाप पाडता आली नाही. दौऱ्यानंतर दुखापतीमुळे त्यांची कारकीर्द संपुष्टात आली.

दत्ताजीराव गायकवाड यांच्या कारकीर्दीवर चित्रफित

भारताचे सर्वात वयोवृद्ध माजी कसोटीपटू आणि माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीवर आधारित एक चित्रफीत या कार्यक्रमात दाखविली जाणार आहे. यात चंदू बोर्डेसह अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया आहेत. १९५९ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व दत्ताजीराव यांनी केले होते. त्या दौऱ्यावरील काही कसोटीपटूच आजही हयात आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक