एखादा फलंदाज फ्री हिटवर बाद झाला, तरीही तो धावांसाठी पळू शकतो, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमावलीत नमूद असल्याचे भान राखत विराट कोहलीने समसूचकता दाखवून तीन धावा पळून काढल्यानेच भारताचा पाकिस्तानवरील विजय सुकर झाला, असे आता स्पष्ट होत आहे.
आयसीसीच्या नियमानुसार, फ्री हिटवर चेंडू बॅटला लागून यष्टींना धडकला. तरीही फलंदाज पळून धावा काढू शकतो. पळून काढलेल्या या धावा आपसुकच त्याच्या खात्यात जमा होतात. परंतु फ्री हिटवर एखादा फलंदाज त्रिफळाचीत झाला व त्याने पळून धावा काढल्या, तर त्या धावा फलंदाजाच्या खात्यात जमा न होता त्या अतिरिक्त म्हणून गणल्या जातात.
कोहलीने त्रिफळाचीत झाल्यानंतरही पळून काढलेल्या तीन धावा अतिरिक्त धावा म्हणून भारताला मिळाल्या. भारताला या धावा आयसीसीच्या नियमानुसारच मिळाल्या.
रविवारच्या सामन्यात भारताने कोहलीच्या ५३ चेंडूंतील नाबाद ८२ धावांच्या अविस्मरणीय खेळीच्या जोरावर पाकिस्तानवर थरारक विजय मिळविला. त्याच्या समयसूचकतेने कोट्यवधी भारतीय चाहत्यांची मने जिंकली. शेवटच्या षटकात पाकिस्तानी संघ आणि त्यांचे संपूर्ण चाहतेही संभ्रमात पडल्याचे प्रत्ययास आले. पाकिस्तानचा कर्णधार त्याच्या सहकाऱ्यासह पंचांशी नियम जाणून घेताना दिसून आला.
शेवटच्या षटकातील चौथा चेंडू कंबरेपर्यंतच्या उंचीवरून विराटच्या बॅटवर धडकला. त्यावर कोहलीने षटकार लगावला. त्यानंतर कोहलीने पंचांकडे पाहून चेंडूच्या उंचीवर आक्षेप घेतला. कोहलीचा आक्षेप उचलून धरत पंचांनी चेंडू नो बॉल घोषित केला.
पुढील चेंडू अर्थातच फ्री हिट झाला. त्यावर कोहली त्रिफळाचीत झाला. चेंडू यष्टींवर धडकून दूर गेल्याने विराटने पळून तीन धावा काढल्या. कोहली आणि कार्तिक यांनी तीन धावा काढल्याचे पाहून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने याविषयी पंचांशी चर्चा केली. पाकिस्तानी खेळाडूंनी हा चेंडू डेड असल्याचाही दावा केला; पण पंचांनी या तिन्ही धावा भारताच्या नावावर केल्या.
सामना संपल्यानंतरही अनेकांनी यासंबंधीचा नियम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विराटने कोणत्या नियमांतर्गत फ्री हिट चेंडू स्टम्पवर धडकल्यानंतरही धावा पळून काढल्या, हे पडताळून पाहिल्यानंतर कोहलीचे नियमांचे भान आणि कमालीची समयसूचकता यामुळे अनेकजण थक्क झाले.