येत्या १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी मोहम्मद शमीसह तीन खेळाडू गुरुवारी ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचून संघात सामील होणार आहेत. शमीबरोबतच मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर संघात सामील होणार आहेत. यापैकी एका खेळाडूची दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी निवड होणार आहे. भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. त्यानंतर दीपक चहरलाही दुखापतीमुळे बाहेर जावे लागले. चहर पाठदुखीमुळे टी-२० वर्ल्डकपला मुकला आहे. आता गोलंदाज शमी, सिराज आणि शार्दुल संघात सामील होणार असल्याने टीम इंडियाला दिलासा मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर या तिघांपैकी एकाला बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून घोषित केले जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वन-डे मालिकेत मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी केली. त्यामुळे निवड समितीसमोर मोहम्मद सिराज की मोहम्मद शमी अशी द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे. सिराजचे ऑस्ट्रेलियातील ट्रॅक रेकॉर्डदेखील शानदार आहे. त्यामुळे बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून सिराजच्या नावाची घोषणादेखील होण्याची शक्यता काहीजण व्यक्त करीत आहेत.
याबाबतची घोषणा काही दिवसांतच होणार आहे. भारताने आयसीसीला १५ ऑक्टोबरपर्यंत आपल्या संघातील बदलासह अपडेटेड संघ कळविणे आवश्यक आहे. त्यामुळे बीसीसीआयला १५ऑक्टोबरपूर्वीच बुमराहच्या रिप्लेसमेंटची घोषणा करावी लागणार आहे.
टीम इंडियाला दोन सराव सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाने एका अनऑफिशिअल सराव सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळविल्याने खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे.
दुसरा अनऑफिशिअल वॉर्मअप सामना १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर १७ ऑक्टोबर आणि १९ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया सराव सामना खेळणार आहे.
बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून शमी सर्वात प्रबळ दावेदार
बुमराहची रिप्लेसमेंट शमी सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे. शमीने कोरोनावर मात करत फिटनेस टेस्टदेखील पास केली आहे. शमी आणि दीपक चहर यांना वर्ल्डकपसाठी भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले होते. दीपक दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. अशात सिराज आणि शार्दुल यांना ऑस्ट्रेलियाला पाठविले जात आहे. बुमराहच्या जागी शमीला खेळविल्यास सिराज आणि शार्दुल राखीव राहतील.
टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय टीम
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह. राखीव खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.