क्रीडा

भारताला रोखण्यासाठी अन्य १५ संघांत चुरस!आजपासून आफ्रिकेत १९ वर्षांखालील युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा थरार

भारतीय संघ शनिवारी बांगलादेशविरुद्धच्या लढतीने आपल्या अभियानाला प्रारंभ करेल. भारत, बांगलादेशसह आयर्लंड व अमेरिका यांचा अ-गटात समावेश करण्यात आला आहे.

Swapnil S

ब्लोमफोंटेन (दक्षिण आफ्रिका) : भारतीय संघाने युवा विश्वचषकात नेहमीच वर्चस्व राखले आहे. आता दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारपासून १५व्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत १६ संघांत रंगणारी ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात खेळवली जाणार आहे. शुक्रवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज लढतीद्वारे स्पर्धेला प्रारंभ होईल.

भारताने आतापर्यंत २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ अशा पाच वेळेस युवा विश्वचषक उंचावला आहे. गेल्या युवा विश्वचषकात यश धूलच्या नेतृत्वाखाली भारताने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत विजेतेपद पटकावले. तसेच २००६, २०१६ व २०२०च्या हंगामात भारताने उपविजेतेपद मिळवले. यंदा भारताला युवा आशिया चषकात पराभव पत्करावा लागला. मात्र तरीही उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाकडून जेतेपदाची आशा बाळगण्यात येत आहे. भारतीय संघातील महाराष्ट्राचा अर्शीन कुलकर्णी व अरावेली अविनाश यांना आयपीएल लिलावात बोली लावण्यात आल्याने त्यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. अष्टपैलू मुशीर खान हा एकमेव मुंबईकर भारतीय संघात आहे.

भारतीय संघ शनिवारी बांगलादेशविरुद्धच्या लढतीने आपल्या अभियानाला प्रारंभ करेल. भारत, बांगलादेशसह आयर्लंड व अमेरिका यांचा अ-गटात समावेश करण्यात आला आहे. बांगलादेशनंतर भारतीय संघ अनुक्रमे आयर्लंड (२५ जानेवारी) व अमेरिका (२८ जानेवारी) यांच्याशी खेळेल. ६ व ८ फेब्रुवारी रोजी उपांत्य, तर ११ फेब्रुवारीला बेनोनी येथे अंतिम सामना खेळवण्यात येईल. बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आफ्रिका या संघांकडून भारताला स्पर्धेत कडवी चुरस मिळू शकते.

युवा विश्वचषकासाठी भारताचा संघ

उदय सहारन (कर्णधार), सौम्य कुमार पांडे, अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रूद्र पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, मुरुगन अभिषेक, अरावेली अविनाश, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी. राखीव खेळाडू : प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमान.

स्पर्धेविषयी महत्त्वाचे

१६ संघांची प्रत्येकी ४ गटात विभागणी करण्यात आली आहे.

प्रत्येक गटातून तीन संघ म्हणजे एकूण १२ संघ सुपर-सिक्स फेरीसाठी पात्र ठरतील.

१२ संघांची दोन गटांत विभागणी केल्यावर सर्व संघ प्रत्येकी तीन सामने खेळतील. त्यांचे साखळी फेरीचे गुण पुढेही ग्राह्य धरण्यात येतील.

सुपर-सिक्समध्ये दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

या स्पर्धेत डीआरएस उपलब्ध नसल्याने मैदानावरील पंचांचाच निर्णय अंतिम असेल.

गटवारी

अ-गट : भारत, बांगलादेश, आयर्लंड, अमेरिका

ब-गट : इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड

क-गट : ऑस्ट्रेलिया, नामिबिया, श्रीलंका, झिम्बाब्वे

ड-गट : पाकिस्तान, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, नेपाळ

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश