एक्स @BCCIdomestic
क्रीडा

विदर्भ तिसऱ्यांदा रणजीचा राजा; रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावातील आघाडीमुळे केरळवर मात

अखेर विदर्भाने गतवर्षीची कसर भरून काढताना तिसऱ्यांदा रणजीचा राजा ठरण्याचा मान मिळवला. अक्षय वाडकरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या विदर्भाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात केरळवर पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मात केली.

Swapnil S

नागपूर : अखेर विदर्भाने गतवर्षीची कसर भरून काढताना तिसऱ्यांदा रणजीचा राजा ठरण्याचा मान मिळवला. अक्षय वाडकरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या विदर्भाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात केरळवर पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मात केली. पाच दिवसांच्या खेळानंतरही उभय संघांतील सामना अनिर्णित राहिला, तर स्पर्धेच्या नियमानुसार पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्यात येते.

नागपूर, जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील या लढतीत पाचव्या दिवशी विदर्भाने दुसऱ्या डावात १४३.५ षटकांत ९ बाद ३७५ धावा केल्या. त्यावेळी किमान ३६ षटकांचा खेळ शिल्लक होता, तर विदर्भाची एकूण आघाडी ४१२ धावांची होती. मात्र दोन्ही संघांच्या खेळाडूंनी यावेळी निकाल लागणे शक्य नसल्याचे मान्य केले. त्यामुळे पंचांच्या सहमतीने हातमिळवणी केली. परिणामी विदर्भाने पहिल्या डावात घेतलेल्या ३७ धावांच्या आघाडीमुळे त्यांनी बाजी मारली. विदर्भाने पहिल्या डावात ३७९, तर केरळने ३४२ धावा केल्या होत्या. विदर्भाचे हे तिसरे रणजी जेतेपद ठरले. यापूर्वी त्यांनी २०१७-१८, २०१८-१९ मध्ये रणजी स्पर्धा जिंकली होती.

ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या रणजी स्पर्धेचा यंदाचा ९०वा हंगाम होता. दर्भाने उपांत्य फेरीत मुंबईला धूळ चारून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे यंदा घरच्या मैदानात जेतेपद मिळवण्यात विदर्भ यशस्वी ठरला. गतवर्षी मुंबईने विदर्भाला अंतिम फेरीत नमवले होते. दुसरीकडे सचिन बेबीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या केरळने प्रथमच अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

चौथ्या दिवसअखेर विदर्भाने दुसऱ्या डावात ९० षटकांत ४ बाद २४९ धावा केल्या होत्या. करुण नायर १३२, तर अक्षय ४ धावांवर खेळत होता. तेथून पुढे रविवारी पाचव्या दिवशी करुण लगेच बाद झाला. मात्र दर्शन नळकांडे व अक्षय यांनी केरळला हैराण केले. अक्षय (२५) बाद झाल्यावर कर्णेवार (३०) व दर्शन यांनी ४८ धावांची भर टाकली. अखेर दर्शनचे अर्धशतक झाल्यावर सामना थांबवण्यात आला. पहिल्या डावात १५३, तर दुसऱ्या डावात ७३ धावा करणाऱ्या दानिश मलेवारला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. स्पर्धेत सर्वाधिक ६९ बळींसह ४७६ धावा करणारा हर्ष दुबे मालिकावीर म्हणजेच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

संक्षिप्त धावफलक

विदर्भ (पहिला डाव) : ३७९

केरळ (पहिला डाव) : ३४२

विदर्भ (दुसरा डाव) : १४३.५ षटकांत ९ बाद ३७५ (करुण नायर १३५, दानिश मलेवार ७३, दर्शन नळकांडे नाबाद ५१; आदित्य सरवटे ४/९६)

सामनावीर : दानिश मलेवार

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : हर्ष दुबे

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : सर्व स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ ॲप अनिवार्य; सायबर फसवणुकीवर लगाम

"काँटनेवाले अंदर बैठे हैं"; संसदेत श्वान आणणाऱ्या खासदार रेणुका चौधरींचा सरकारवर निशाणा, भाजपकडून कारवाईची मागणी

मुंबईत पुन्हा हाय अलर्ट! २ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर

ठाणे ते दक्षिण मुंबई अवघ्या ३० मिनिटांत! MMRDA कडून एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशनच्या कामाला सुरुवात

'उतावीळ लोकं, उतावीळ कामं'! समांथाने राज निदिमोरूशी 'गुपचूप' केलं लग्न; दिग्दर्शकाच्या पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत