क्रीडा

विनेशकडून नियमांना बगल; एकाच दिवशी दोन गटांत दंगल! ऑलिम्पिक पात्रता फेरीत ५० किलो वजनी गटात खेळणार

Swapnil S

पतियाळा : बजरंग पुनिया, रवी दहिया यांच्या पदरी निराशा पडली असली तरी भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटचे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न कायम आहे. पतियाळा येथे पार पडलेल्या निवड चाचणीत विनेशने ५० किलो वजनी गटातून विजेतेपद मिळवून जागतिक ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी पात्रता सिद्ध केली. संयुक्त जागतिक कुस्ती महासंघाच्या (यूडब्ल्यूडब्ल्यू) नियमाला बगल देत एकाच दिवशी ५० व ५३ किलो वजनी गटातून दिलेली चाचणी, तसेच ५३ किलो गटासाठीही ऑलिम्पिक संधी मिळवण्यासाठी मागितलेली लेखी हमी यामुळे कुस्ती निवड चाचणीच्या दुसऱ्या दिवशी विनेशचीच चर्चा रंगली होती.

विनेशच्या नियोजित ५३ किलो वजनी गटातून यापूर्वीच अंतिम पंघलने ऑलिम्पिक पात्रता निश्चित केली आहे. त्यामुळे विनेशने ऑलिम्पिकसाठी ५० किलो वजनी गटातून खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ऑलिम्पिक संघ निवडीसाठी स्वतंत्र चाचणीत संधी मिळण्याची लेखी हमी विनेशने मागितल्यामुळे जवळपास अडीच तासांहून अधिक काळ ५० आणि ५३ किलो या दोन्ही वजनी गटातील निवड चाचणी सुरू होऊ शकली नव्हती.

चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर अखेर ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’च्या एका दिवशी केवळ एकाच वजनी गटातून चाचणी देण्याच्या नियमाला बगल देत विनेशला दोन्ही वजनी गटातून चाचणी देण्याची संधी देण्यात आली. यामध्ये ५० किलो वजनी गटात विनेशने शिवानीचा गुणांवर ११-६ असा पराभव करून विजेतेपद मिळवले आणि जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. मात्र, ५३ किलो वजनी गटात विनेशला अंजूने तांत्रिक कौशल्याच्या आधारावर ०-१० असे पराभूत केले. त्यामुळे विनेशची या गटातून ऑलिम्पिक खेळण्याची आशा मावळली. या वजनी गटातून अंतिम निवड चाचणीस सहभागी होण्यासाठी विनेशला पहिल्या चारमध्ये येणे भाग होते. विनेशला या गटात पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.

माझी लढाई अद्याप संपलेली नाही. ऑलिम्पिक पात्रता मिळवल्यावरच मी शांत बसेन. पुढील महिन्यात ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होणार असून ५३ किलो शक्य नसले तरी, ५० किलो वजनी गटात देशाचे प्रतिनिधित्व करून पदक जिंकण्यासाठी मी आतुर आहे. सहा वर्षांपूर्वीसुद्धा मी या गटात खेळली होती. त्यामुळे मला फारसा बदल जाणवणार नाही. - विनेश फोगट

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

गोल्डन चान्स! या फेमस Electric Scooter वर मिळतोय तब्बल १० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स

फक्त ६५ हजारात मिळतीये Electric Scooter, चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही; जाणून घ्या रेंज अन् किंमत

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही