दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) २०२३ या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा या दोघांना नामांकन लाभले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्स आणि सलामीवीर ट्रेव्हिस हेड हेसुद्धा या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूच्या पुरस्कारासाठी भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला नामांकन देण्यात आले आहे.
दरवर्षी जानेवारी महिन्यात आयसीसीकडून वार्षिक पुरस्काराचे नामांकन तसेच वितरण करण्यात येते. विजेत्यांची निवड करताना चाहत्यांची मते तसेच परीक्षकांच्या मतांचा एकत्रित आढावा घेण्यात येतो. परीक्षकांमध्ये माजी क्रिकेटपटू, समालोचक, आयसीसी हॉल ऑफ फेमचे सदस्य तसेच आयसीसीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असतो. गुरुवारी आयसीसीने टी-२० व एकदिवसीय प्रकारातील नामांकनाची यादी जाहीर केली होती. त्यानंतर शुक्रवारी कसोटी व एकंदर वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या पुरस्कारासाठी नामांकने आयसीसीने घोषित केली.
वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला सर गॅरफिल्ड सोबर्स ट्रॉफीने गौरवण्यात येते. विराटने २०१७ व २०१८मध्ये हा पुरस्कार पटकावला होता. यावेळी त्याला तिसऱ्यांदा हा मानाचा पुरस्कार पटकावण्याची संधी आहे. विराटने २०२३ या वर्षात कसोटी व एकदिवसीय मिळून ३५ सामने खेळले. त्यामध्ये त्याने २,०४८ धावा करताना कसोटीत २ शतके झळकावली, तर एकदिवसीय प्रकारात तब्बल ६ शतके साकारली. विराटने २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात ३ शतकांसह सर्वाधिक ७६५ धावा केल्या. तसेच एकदिवसीय प्रकारात ५० शतकांचा टप्पाही गाठला.
डावखुरा अष्टपैलू जडेजाने २०२३मध्ये ३५ सामने खेळताना ६१३ धावा केल्या, तसेच ६६ बळीही मिळवले. जडेजाने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत २२ बळी मिळवले. दुखापतीमुळे तो आशिया चषकाला मुकला. मात्र एकदिवसीय विश्वचषकात त्याने १६ बळी मिळवून भारताच्या वाटचालीत मोलाची भूमिका बजावली. त्याने एकदिवसीय प्रकारात वर्षभरात ३१ बळी मिळवले.
जडेजा व विराटला हेड व कमिन्स यांच्याकडून कडवी चुरस लाभेल. वेगवान गोलंदाज कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने गतवर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद व विश्वचषक उंचावला. तसेच अॅशेस करंडक कायम राखला. कमिन्सने २४ सामन्यांत ४२२ धावा करताना ५९ बळी मिळवले. दुसरीकडे डावखुरा फलंदाज हेडने जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि विश्वचषकाच्या अंतिम फेरीत शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला विजयी केले. तसेच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही तो सामनावीर ठरला होता.
वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूच्या शर्यतीत अश्विनला हेड, उस्मान ख्वाजा आणि इंग्लंडचा जो रूट यांच्याकडून कडवी चुरस मिळेल. अश्विनने वर्षातील ७ कसोटींमध्ये ४१ बळी मिळवले. तो जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान आहे.
नामांकने
वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू
विराट कोहली (भारत)
रवींद्र जडेजा (भारत)
ट्रेव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया)
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)
वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू
रवीचंद्रन अश्विन (भारत)
उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया)
ट्रेव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया)
जो रूट (इंग्लंड)